- संजय सोनार
चाळीसगाव (जि. जळगाव) : मराठा समाजाला ७० वर्षे आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागली. जळगाव जिह्यात साडे तीन लाख शासकीय नोंदी आढळल्या आहेत. यामुळे या प्रत्येक घरात आरक्षण जाणार आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. जरांगे यांच्या खान्देशातील दौऱ्याला आज रविवारी चाळीसगाव येथून सुरुवात झाली. चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार शब्दात टीका केली.
ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. समाजाच्या एकजुटीमुळे आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. शासकीय नोंदी सापडू लागल्या आहेत. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी गेल्या पाच महिन्यापासून लढा सुरू आहे. सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन एकजूट करून घराघरात हा संदेश द्या. कारण ही शेवटची संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्वांनी पुढे या, असे कळकळीचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत केले. माझा जीव गेला तरी चालेल परंतु आरक्षण मिळविल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी सभेत दिला.