लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठी महापालिकेने महावितरणकडे दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा निधी मनपाने वर्ग केल्यामुळे पुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेले विद्युत खांब हटविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महावितरणकडून संपूर्ण तयारी झाली असून, आठवडाभरात कामाला सुरुवात करू, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांनी दिली.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडीच वर्षांपूर्वीच कामाला सुरुवात झाली होती. मात्र, २२ महिन्यांचे काम अडीच वर्षात देखील होत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच पुलालगतचे विद्युत खांब हटविण्याचे काम रखडत असल्याने अनेक महिन्यांपासून पुलाचे काम थांबले होते. याबाबत ‘लोकमत’ने २१ रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा व सत्ताधाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने महावितरणला आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्तांना पत्र पाठवून, आयुक्तांनीही हा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी हा निधी महावितरणला वर्ग करण्यात आला असून, लवकरच या कामाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे.
पाईपलाईनचाही अडथळा झाला दूर
उड्डाणपुलाच्या कामासाठी विद्युत खांबासोबतच मनपाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचादेखील अडथळा होता. मात्र, मनपा पाणीपुरवठा विभागाने जुनी पाईपलाईन डेड करून ती पुलाला अडथळा ठरणार नाही. अशा ठिकाणी स्थलांतरित करून घेतली आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला अडथळा ठरणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली.