तहसील भागातील अतिक्रमण काढा
जळगाव - शहरातील तहसील कार्यालय परिसरात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही मनपाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. राहुल शिरसाठ यांनी मनपा प्रशासनाकडे याबाबत पुन्हा तक्रार केली असून, तत्काळ कारवाईची मागणी शिरसाठ यांनी केली आहे.
दोन दिवसात रुजू होतील नवीन उपायुक्त
जळगाव - महापालिकेतील उपायुक्तपदाच्या रिक्त जागांवर तब्बल दहा महिन्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शाम गोसावी व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त दीपक सावंत यांची सोमवारी मनपा उपायुक्तपदी निवड करण्यात आली असून, गोसावी दोन दिवसात मनपा रुजू होणार आहेत. तर सावंत सोमवारी मनपाचा पदभार घेणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आह.
महापौरांनी शनिपेठ भागात केली पाहणी
जळगाव - शहरात विविध भागात एलईडी बसविण्याचे काम सुरु असून, महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी सायंकाळी शनिपेठ भागात जावून एलईडीच्या कामाची पाहणी केली. याठिकाणी काही एलईडी बंद अवस्थेत आढळून आले. महापौरांनी तत्काळ मक्तेदाराला सूचना देत बंद एलईडी पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. गवळीवाडा, रिधुरवाडा, काट्याफैल भागातदेखील महापौरांनी पाहणी केली. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते.
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले
जळगाव - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता, योग, आरोग्य, कृषी, युवा उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मौलाना आझाद फाऊंडेशनतर्फे मौलाना आझाद आदर्श पुरस्कार २०२० या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.