लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणारा जैविक कचरा संकलन करणाऱ्या माॅन्साई बायो मेडिकल वेस्ट कंपनीने मनपा प्रशासनाकडे तब्बल सात वर्षांपासून आपला ऑडिट रिपोर्ट सादर केला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच जैविक कचरा संकलनात संबंधित कंपनीने मनपा प्रशासनाची फसवणूक केल्याची तक्रारदेखील मनपाकडे प्राप्त झाल्यामुळे मनपा प्रशासनाने संबंधित कंपनीला पाच दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे.
शहरातील दिनेश भोळे यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये माॅन्साई बायो मेडिकल वेस्ट कंपनीने मनपा प्रशासनाकडे भरावयाचा रॉयल्टीमध्ये मनपाची फसवणूक केल्याचा आरोप भोळे यांनी केला होता. यासह अनेक रुग्णालयांमधील कचरा संकलन करूनदेखील संबंधित कंपनीने त्या रुग्णालयांची यादी महापालिका प्रशासनाकडे सादर केली नव्हती, असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीच्या आनुषंगाने महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आता मनपाने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित कंपनीने मनपा प्रशासनाकडे २०१३ ते २०२० या सात वर्षांमधील ऑडिट रिपोर्ट मनपाकडे सादर केलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात हे ऑडिट रिपोर्ट संबंधित कंपनीला मनपाकडे सादर करणे बंधनकारक असतानादेखील कंपनीने ऑडिट रिपोर्ट सादर केलेले नाहीत. विशेष म्हणजे याबाबत मनपा प्रशासनाने अनेक वेळा संबंधित कंपनीला नोटिसादेखील बजावला होत्या.
संपूर्ण रुग्णालयांची यादी पाठवण्याचा सूचना
माॅन्साई बायो मेडिकल वेस्ट कंपनीने अद्यापही महानगरपालिकेच्या हद्दीतील व बाहेरील २०० किमीच्या आतील सर्व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी मनपा प्रशासनाकडे सादर केलेले नाही. ही यादी संबंधित कंपनीने सात दिवसांच्या आत महापालिकेकडे सादर करण्याच्या सूचना मनपा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. यासह दिनेश भोळे यांचा तक्रारीनुसार संबंधित कंपनीने मनपाची रॉयल्टी थकविण्याच्या आरोपानुसार मनपा प्रशासनाकडे संपूर्ण माहिती कागदपत्रांनुसार सादर करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणात संबंधित कंपनीने मनपा प्रशासनाची तब्बल ३ ते ४ कोटी रुपयांची रॉयल्टी थकविल्याचा आरोप दिनेश भोळे यांनी केला आहे. याबाबत भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेदेखील याबाबतची तक्रार दाखल केली आहे.