लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील बाहेती महाविद्यालयात बी.कॉमचे शिक्षण घेत असलेली मानसी शर्मा गेल्या चार वर्षांपासून मॉडेलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. मध्यमवर्गीय कुंटूंबातील असतानाही मानसी हिने हे क्षेत्र आपल्या आवडीने निवडले आहे. तसेच तिच्या आवडीला आई सुशीला शर्मा, वडील राजेश शर्मा व बहिण रागिणी शर्मा यांनी देखील मोलाची साथ दिली असून, या साथीच्या जोरावर मानसी गेल्या वर्षी 'इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस ऑफ इंडिया २०२०' विजेती ठरली आहे. संपुर्ण खान्देशात हा पुरस्कार ठरणारी मानसी ही पहिलीच युवती ठरली आहे.
गीगी हदीद ला आदर्श मानत सुरु केली मॉडेलिंग
मानसीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ व सेंट टेरेसामधून झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण शहरातील बाहेती महाविद्यालयात सुरु आहे. एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुसरीकडे आपल्या आवडीलाच आपले करीयर बनविण्यासाठी मानसीचे प्रयत्न सुरु होते. हॉलीवुडची प्रसिध्द मॉडेल गीगी हदीद हिलाच आपली आदर्श मानत मानसीने फॅशनच्या दुनियेत पाय ठेवला, आणि चार वर्षातच मानसी आपल्या टॅलेंटच्या जोरावर यश संपादित करत आहे. शहरातील लहान-मोठ्या फॅशन शोमध्ये सहभागी होवून, मानसीने काही फोटोग्राफर्ससोबत करार करुन मॉडेलिंग सुरुवात केली. चार वर्षातच 'इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस ऑफ इंडिया २०२०' ची मानकरी ठरली आहे.
आयकॉनिक फ्रेश फ्रेस ऑफ इंडिया ठरल्यानंतर मानसीला तेलगु, कन्नड चित्रपटांचेही देखील ऑफर आल्या आहेत. मात्र, चित्रपटात करीअर न करता केवळ मॉडेलिंगमध्येच करीअर करण्याची इच्छा मानसीची आहे.
मॉडेलिंग असो वा कोणतेही क्षेत्र, त्यामध्ये जर आपल्याला आवड असली तर कोणतीही संधी न दवडता त्या संधीचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे मानसीने सांगितले. मग ती संधी कोणत्या स्तरावर मिळते हे पाहणे गरजेचे नाही. जिल्हा असो वा तालुकास्तर प्रत्येक स्तरावर आपण आपल्यातले गुण दखवून यशाचा मार्ग निवडला पाहिजे असेही मानसी सांगते. चार वर्षाच्या करीअरमध्ये मानसीला 'इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस ऑफ इंडिया २०२०' सोबतच मिस क्वीन इंडीया, साम्राज्ञी खान्देशाची, युथ आयकॉन २०१९ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.