जळगाव : काही महिन्यांपूर्वी महाबळ परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, आता पुन्हा शिवकॉलनीत दूषित पाणी पुरवठा झाल्याने अनेक रहिवाशांना पोटदुखीचा त्रास झाल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. याबाबत रहिवाशी सोमवारी आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. शुक्रवारी दुपारी पाणी पुरवठा झाल्यानंतर, सायंकाळी येथील रहिवासी शरयू सोनार, ज्योती बिचवे, अंकिता पाटील, अमृता गोसावी, खुशी गोसावी यांचे अचानक पोट दुखायला लागले. तर काही नागरिकांना जुलाबाचा त्रास झाला. पाण्यामुळेच पोटदुखीचा प्रकार घडला असल्याचे या नागरिकांनी सांगितले. तसेच काही नागरिकांनी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर काही वेळ काळसर पाणी आले असल्याचे सांगितले.
परिसरातील अनेक नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळी पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे, नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शनिवारी मनपाला सुट्टी असल्यामुळे, सोमवारी आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे या रहिवाश्यानी सांगितले.
इन्फो :
शुक्रवारी दुपारी पाणी पुरवठा झाल्यानंतर माझ्या पत्नीला पोटदुखीचा त्रास झाला. तर गल्लीतील इतर महिला व नागरिकानांही पोटदुखीचा त्रास झाला. एकाच वेळेस अनेकांना हा त्रास झाल्यामुळे, पाण्यामुळेच हा त्रास झाल्याचा अंदाज आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांना भेटून, तक्रार करणार आहोत.
पंकज पाटील, रहिवासी, शिवकॉलनी.