अजय पाटील, जळगाव: यंदा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर, विरोधी पक्षातील अनेकांचे चेहरे पडले होते. त्यामुळे आता पुढील वर्षी अर्थसंकल्प मांडला जाईल, तोपर्यंत विरोधी पक्षातील अनेकजण भाजपच्या वाटेवर येतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी जळगाव शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे मेळावे व बैठका घेण्यात आल्या. त्याआधी शहरातील आयएमए सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश संघटक विजय चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये परत येण्याबाबतची विनंती केली आहे का ? याबाबतचा प्रश्न बावनकुळे यांना उपस्थित केल्यानंतर, खडसेंनी आतापर्यंत पक्ष प्रवेशाबाबत कोणाचीही भेट घेतली नाही, किंवा खडसेंना पक्षाकडून देखील कोणतीही विचारणा झाली नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, आगामी काळात राज्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर राहतील असा दावा बावनकुळे यांनी केला.
काय म्हणाले बावनकुळे...?
१. कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, मेहनत पुर्ण घेतली होती. मात्र, यश मिळाले नाही. तसेच मतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, समोर आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये भाजपला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.२. आगामी सर्व निवडणुका भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये जर काही जागांवर दोन्ही पक्षाचे तुल्यबळ उमेदवार राहिले तर त्या ठिकाणी मैत्रिपुर्ण लढत आम्हाला खेळावी लागणार.३. देशात विरोधी पक्ष एकत्रित येत असले तरी ते विचारांनी एकत्रित येत नाही, किंवा देशाच्या भल्यासाठी एकत्रित येत नाही. ते केवळ भाजपला रोखण्यासाठी एकत्रित येत असल्याचे त्यांनी सांगितले.४. भाजपची वाट आधी देखील बिकट नव्हती, आता देखील नाही व भविष्यात ही बिकट राहणार नाही. भाजपला २०१४ व २०१९ ज्या तुलनेत चांगले यश २०२४ मध्ये मिळणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
शरद पवारांना १०० जागा जिंकता आल्या नाहीत, राष्ट्रवादी म्हणजे किंचीत पक्ष
राष्ट्रवादी कॉग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आला, तो निवडणूक आयोगाने काढला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा किंचीत पक्ष आहे. शरद पवारांना राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणता आली नसून, त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर १०० जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे त्या पक्षाबाबत फारसे बोलणार नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी शरद पवार यांना टोला लगावला.