कजगाव, ता. भडगाव : जळगाव चांदवड या मार्गाचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासूूून सुरू आहे. वळण रस्त्यावरील काम जमीन अधिग्रहितसाठी खोळंबले आहे. थांबलेल्या प्रत्येक ठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे अपघात नित्याचे झाले आहेत. बरेचसे काम वळणावर खोळंबले आहे. सुसाट येणारी वाहने वळणावर पावसामुळे झालेल्या चिखलात आदळत आहेत.
पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान जेवढी कामे खोळंबली आहेत, ती सारी वळणावरची आहेत. पासर्डीच्या या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात झाले आहेत. या ठिकाणी एकाच दिवशी चक्क दोन वाहने नाल्यात कोसळली होती. आजही त्या नाल्याजवळचा रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे.
कजगावच्या बसस्थानक चौकात उपाययोजना गरजेची
कजगावचे बसस्थानक चौक हा परिसर चाळीसखेड्याची चाैपाटी बनली आहे. दिवस उजाडताच येथे गर्दी उसळते. या ठिकाणावरून गेलेल्या महामार्गावर गतिरोधक देण्यात आलेले नाही. या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी दोन्ही बाजूंस शाळा, हायस्कूल, एका बाजूस रेल्वे स्टेशन, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या मार्गाला ओलांडून ये-जा करावी लागते. मात्र या ठिकाणी उपाययोजना नसल्याने मोठी दुर्घटना घडू शकते.
भोरटेकच्या बोगद्याचे काम होणे महत्त्वाचे
भोरटेक गावाजवळील दोन गावांना जोडणाऱ्या बोगद्याच्या कामास अद्याप सुरुवात न झाल्याने या दोन गावांतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेत रस्ता ओलांडावा लागत आहे. गावातून रस्ता ओलांडूनच शेतात जावे लागते. मात्र ना बोगद्याचे काम होत आहे, ना रस्ता दुरुस्त होत आहे. रस्ता काँक्रिटचा झाल्याने वाहने सुसाट धावतात आणि अचानक वळणावरील थांबलेली कामे अपघात घडवत आहेत.
शेतजमिनी गेल्या खोल खड्ड्यात
महामार्गाचे काम झाले, मात्र महामार्गालगत असलेल्या या जमिनी चक्क पाच ते सात फूट खोल झाल्या आहेत. रस्ता झाला उंच आणि शेती झाल्या खोल, यामुळे या मार्गावरील साऱ्याच शेतकऱ्यांना मोठी कसरत करत शेती हंगाम आवरावा लागत आहे. यात प्रसंगी मोठी दुर्घटना घडू शकते, यासाठी ठेकेदाराने प्रत्येक ठिकाणी शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता बनवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
लख्ख चमकणारी लाइट
या महामार्गावर कजगाव, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी दुभाजकामध्ये लख्ख चमकणारी लाइट बसविण्यात आली आहे. मात्र ती केवळ शोपीस म्हणूनच उभी असल्याचे दिसते. कारण बसविल्यानंतर ट्रायल म्हणून तीन दिवस सुरू करण्यात आली. त्यानंतर दीपावलीसाठी तीन दिवस सुरू करण्यात आली होती. ती बंद पडली आहे.
अन्यथा रास्ता रोको
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. थांबलेली कामे ही वळणावरील असल्याने अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कामे मार्गी लावावी, अन्यथा नागरिक रास्ता रोको आंदोलन करतील, अशी चर्चा नागरिकांत आहे.
===Photopath===
240621\24jal_1_24062021_12.jpg
===Caption===
भोरटेकजवळ थांबलेल्या बोगद्याच्या कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.