जळगाव शहरातील ‘काव्यरत्नावली’ चौक हे जळगावात येणाऱ्या साहित्यप्रेमींचं आकर्षण ठरलेलं आहे. १९९० मध्ये बालकवी जन्मशताब्दीनिमित्त कविवर्य पद्मश्री ना.धों.महानोर आणि जळगावचे प्रख्यात उद्योगपती स्व.पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून जळगावला एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कविवर्य कुसुमाग्रज आले होते. त्याचवेळी कुसुमाग्रजांच्या हस्ते या चौकाचं उद्घाटन झालं होतं. नंतर जैन उद्योग समूहानं आपल्या कलात्मक दृष्टीतून या चौकाचं अत्यंत देखणं सुशोभीकरण केलं.या चौकात जळगाव जिल्ह्यातील बालकवी, बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी आणि दु.वा. तिवारी या चार महत्त्वाच्या कवींच्या कविता चार कोपऱ्यांवर दगडांवर कोरलेल्या आहेत. चार कवितांच्या अवतीभवती धबधब्यासारखे कारंजे आणि वेगवेगळ्या रंगांचे लाईटस् लावलेले आहेत. खाली गालीच्यासारखी हिरव्यागार गवताची लॉन आहे. जिथे बसल्यावर एखाद्या नदीच्या घाटावर बसल्यासारखे वाटावे अशा पायºया बनवलेल्या आहेत. या चौकात चारही कोपºयांवरील पायºयांवर शेकडो माणसं बसलेली असतात.काव्य रत्नावली चौकाला सायंकाळी यात्रेचं स्वरुप प्राप्त होतं. चौकाच्या मध्यभागी मोठा स्तंभ उभारलेला आहे. त्याच्या आजुबाजूनं शहरातील वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू असते. रात्रीच्या वेळी हे दृश्य फार मनोहारी असतं.या चौकाला ‘काव्यरत्नावली चौक’ असं नाव का देण्यात आलं? त्याला कारण आहे लक्ष्मीबाई टिळकांनी ज्यांचा उल्लेख ‘आधुनिक मराठी काव्याचे मालाकार’ असा केला आहे त्या नानासाहेब फडणीस यांनी १८८१ मध्ये जळगावमधून ‘प्रबोधचंद्रिका’ हे दैनिक सुरू केलं. या वृत्तपत्रानं खान्देशातील लोकांना वृत्तपत्र वाचनाची गोडी लावली आणि सांस्कृतिक चळवळीचा प्रसार केला. पुढे १८८७ मध्ये नानासाहेब फडणीस यांनी याच जळगावातून आधुनिक मराठी काव्यांचे उन्मेश निबद्ध करण्यासाठी केवळ कवितेला वाहिलेलं ‘काव्यरत्नावली’ हे मासिक सुरू केलं. आपल्या संपादकत्वाखाली नानासाहेबांनी हे मासिक जळगावहून एका विशिष्ट ध्येयाने, निष्ठेने आणि यशस्वीरीत्या स्वत: आर्थिक झळ सोसून तब्बल ४८ वर्षे चालविले. या ‘काव्यरत्नावली’ने मराठी साहित्य विश्वात इतिहास घडवून आणत अढळ स्थान प्राप्त केलं. काव्यरत्नावलीचे ४८ वर्षातील ४० वर्षांचे खंड आणि एकंदर त्यावेळच्या ६५० कवींच्या ४५४ अंकांमध्ये, १० हजार ४५ पृष्ठांमध्ये एक लाख ८३ हजार कविता प्रकाशित करून नानासाहेब फडणीसांनी आधुनिक मराठी कवितेला असामान्य रूप बहाल केलं.मराठी काव्यक्षेत्रात पुढे मानदंड ठरलेले त्या काळातील केशवसुत, बालकवी, ना.वा.टिळक, साने गुरुजी, लक्ष्मीबाई टिळक, विनायक, चंद्रशेखर, दु.वा. तिवारी, रैंदाळकर अशा कितीतरी महत्त्वाच्या कवींच्या कविता ‘काव्यरत्नावली’तून प्रकाशित होत होत्या. इ.स. १८८७ ते इ.स. १९३५ हा ‘काव्यरत्नावली’चा जीवित काळ ठरला. त्याच काळातील असामान्य प्रतिभेची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा शेतात जाण्याचा रस्ता नानासाहेब फडणीस यांच्या हवेलीकडून होता जिथे ‘काव्यरत्नावली’चं कार्यालय आणि ते छापण्याचा छापखाना होता. शेतात जाता-येता बहिणाबाईला या छापखान्यातील यंत्रांचा आवाज यायचा. अशिक्षित बहिणाबाईला याचं फार नवल वाटायचं. कोºया कागदावर कसं छापलं जातं हे ती खिडकीतून कुतूहलानं डोकावून बघायची. या नानाजीच्या छापखान्यावर तिची एक कविता आहे. त्यात ती असं म्हणते, ‘मानसापरी मानूस। राहतो रे येडजाना। अरे होतो छापीसनी। कोरा कागद शहाना।’ नानासाहेब फडणीस यांच्या या कार्याची स्मृती म्हणून जळगाव शहरात ‘काव्यरत्नावली’ चौक तयार करण्यात आलेला आहे. केवळ कवितेला वाहिलेलं मासिक जवळपास अर्धशतक प्रकाशित करणं ही मराठी कवितेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटनाच म्हणावी लागेल. रोज शेकडो लोक या चौकात येऊन एक प्रकारे ‘काव्यरत्नावली’चा जागर करीत असतात. असा कवितेचा चौक देशात इतरत्र कुठेही नसावा.एकंदरच आजवरच्या मराठी वाङ्मयाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केल्यास जळगाव जिल्हा सतत अग्रेसर असल्याचं लक्षात येईल. थेट रामायण, महाभारत ते नाथ। महानुभाव, वारकरी आणि समर्थ संप्रदायापर्र्यंत वैभवशाली परंपरा असलेल्या जळगाव जिल्ह्याचं स्थान मध्ययुगीन आणि अर्वाचिन काळातही महत्त्वाचं राहिलेलं आहे. मराठी साहित्यात आपलं अढळ स्थान निर्माण करणाºया बºयाच सारस्वतांची जळगाव जिल्हा ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. भारतीय संस्कृती व लोकजीवनावर ज्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ग्रंथांचा प्रभाव हा सार्वकालीन आहे, त्या ग्रंथ निर्मात्यांच्या पदस्पर्शाने जळगाव जिल्ह्याची भूमी पावन झालेली आहे. महाकवी वाल्मीकी याच परिसरात चाळीसगाव जवळ वालझिरे येथे जंगलात रहात होता. तर महाभारतकार व्यासमुनींचे वास्तव्य बराच काळ याच जिल्ह्यातील यावल येथे होते.महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, भडगाव, कनाशी वगैरे परिसरात राहून गेल्याच्या नोंदी महानुभाव पंथीयांनी लिहिलेल्या ग्रंथात जागोजागी आढळतात. महानुभाव वाङ्मयात ज्यांचे स्थान लक्षणीय आहे आणि ज्यांनी ‘श्री ऋद्धीपूर वर्णन’ हा ग्रंथ लिहिलेला आहे, ते नारायण व्यास उर्फ बहाळीये हे चाळीसगावजवळील बहाळ गावाचे होते. बाराव्या शतकातील जगप्रसिद्ध गणितज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हेदेखील चाळीसगावजवळील पाटणादेवी येथे सन १११० ते ११८५ या कालावधित वास्तव्याला होते. तेथेच त्यांनी ‘सिद्धांत शिरोमणी’ आणि ‘लीलावती’ हे अजरामर ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई जळगावपासून जवळच असलेल्या कोथळी या गावी तापी-पूर्णा संगमावर एकाएकी अदृश्य झाली. त्याच परिसरात ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ हा ग्रंथ लिहून ज्यांना उपदेश केला ते महान हटयोगी चांगदेवदेखील तिथेच रहात होते. तसेच कवीश्रेष्ठ संत तुलसीदासांचा एकमेव मराठी शिष्य जनजसवंत यांनी तापी तिरावरील पारेगावला समाधी घेतली आहे. त्याचप्रमाणे ‘सिहासन बत्तीशी’, ‘पंचोपाख्यान’ आणि ‘वेताळपंचविशी’ यासारखे अजरामर ग्रंथ निर्माण करणारे महालिंगदास हे गिरणाकाठी असलेल्या तिरीवाडे येथे राहत होते. खान्देशी लोकगीतातील एक महत्त्वाचा काव्यप्रकार म्हणून ओळखला जाणारा वह्या (वया)ची रचना करणारा एक अवलीया चांगसुलतान हा याच भागातील तापी काठचा तांदलवाडी गावचा होता.स्वातंत्र्यपूर्व काळात खान्देशाचा विशेष करून जळगावचा परिसर हा ‘काव्यतीर्थ’ म्हणून ओळखला जात होता. याच जळगावात कविसंमेलने व वादचर्चा झडत होत्या. आधुनिक मराठी कवितेचे जनक व युगप्रवर्तक कवी केशवसुत याच जिल्ह्यातील भडगाव येथे चार वर्षे व नंतर फैजपूर येथे दोन वर्षे शिक्षक होते. अनेक गाजलेल्या आणि महत्त्वाच्या कविता त्यांनी याच परिसरात लिहिल्या. त्यांना ‘केशवसुत’ हे टोपण नाव ‘काव्यरत्नावली’चे संपादक नानासाहेब फडणीस यांनीच दिले. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म याच जिल्ह्यातील धरणगावचा.१९०७ मध्ये जळगाव येथे झालेल्या कविसंमेलनात त्यांना जरीपटका देऊन त्यांना ‘बालकवी’ हे नामाभिदान दिले व त्यांचा सन्मान करण्यात आला. पुढे ते याच टोपण नावाने निसर्गसौंदर्याने नटलेल्या चित्रमय शैलीतील छंदोबद्ध कविता लिहून प्रसिद्ध पावले. नव काव्याचे प्रवर्तक बा.सी. मर्ढेकर यांचा जन्मही याच जिल्ह्यातील फैजपूरचा. तिथे मर्ढेकरांचे वडील शिक्षक होते. पुढे त्यांनी याच जिल्ह्यातील असोदा आणि बहादरपूरलाही नोकरी केली. मर्ढेकरांचं बालपण आणि नववीपर्यंतचं शालेय शिक्षण याच परिसरात झालं. मराठ्यांचा इतिहास आपल्या लेखणीने ज्वलंतपणे प्रकट करणारे, आपण लिहिलेली वीररसपूर्ण संग्राम गीते खड्या आवाजात गाऊन इंदूर, देवास, झाशी व ग्वाल्हेर ही संस्थाने दुमदुमवून टाकणारे दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी उर्फ दु.वा. तिवारी याच जिल्ह्यातील शेंदुर्णीचे. आधुनिक काळातील पहिला शाहीर म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो.(पूर्वार्ध)-अशोक कोतवाल, जळगाव
मराठी कवितांचं तीर्थक्षेत्र : जळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:58 AM