नशिराबादला संसर्ग वाढतोय
कोरोना : बेफिकिरीचा धोका
नशिराबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना संसर्ग बळावण्याची शक्यता दिसून येत आहे. वेळोवेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व पोलिसांनी मास्क लावा, गर्दी टाळा असे, आवाहन करूनही फारसा उपयोग होत नसल्याचे दिसते.
आजही गावात आरोग्य सूत्रांच्या सर्वेक्षणानुसार गेल्या काही दिवसांपासून सुमारे ४० ते ५० जण कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे. गावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक अंमलबजावणी व निर्बंध लागणे गरजेचे आहे. गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक ना दहशत न भीती, आपल्या गावात काहीही नाही या आविर्भावात वावरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी, बँक,बाजार, किराणा दुकानांवर, महामार्गालगत लागलेली खाद्यपदार्थांची दुकाने रसवंती, मांस विक्री आदी दुकानांवर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरता आतापासूनच कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.