लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना म्हणून आठवडी बाजारांना बंदी घातली आहे. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत शनिवारी खंडेराव नगर परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार भरविला होता. विशेष म्हणजे, बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापरचं केलेला नसल्याचे पहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडालेला होता.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक बाबींना प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यात आठवडी बाजारांचाही समावेश आहे. मात्र, शहरात आठवडी बाजार भरली जात असल्याचे चित्र दर आठवड्याला पहायला मिळत आहे. शनिवारी खंडेराव नगर परिसरात सुध्दा सायंकाळी आठवडी बाजार भरला होता. खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी याठिकाणी झाली होती. बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर केलेला नव्हता. तसेच कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. एकीकडे प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न होत असताना, काही नागरिकांकडून मात्र, त्या उलट केले जात आहे.