जळगाव : जिल्हाभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र त्याचवेळी महामार्गावर थाटली जाणारी दुकाने जोरात सुरू आहेत. महामार्गावर गुरूवारी खेळणी, चप्पलबुट कपडे यांची दुकाने सुरू होती.
जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत असलेली खाद्य पदार्थांची दुकाने, औषधे काही गॅरेज, पेट्रोल पंप वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहे. बाजारपेठेत महापालिकेचे अधिकारी फिरून दुकाने बंद आहेत की नाही याची तपासणी करत आहेत. मात्र त्याचवेळी महामार्गावर गेलेल्या या अतिक्रमणाकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे.
महामार्गावर अग्रवाल चौक ते शिव कॉलनी हा भाग जणू शॉपिंग स्ट्रीटच झाला आहे. या भागात असलेली क्रिकेट बॅटची दुकाने दिवसभर सुरू होती. तसेच लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकान, त्याच बरोबर सायंकाळी चार वाजेनंतर या रस्त्यावर चप्पल बुट विक्रीची दुकाने देखील सुरू झाली होती. त्यामुळे बाजारात कारवाई आणि महामार्गावर मनपा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.