लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात तमाशा कधी रंगणार, या प्रश्नाचे उत्तर आपत्ती व्यवस्थापन
विभागाने हो असे दिले असले तरी अजून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची साथ
मात्र मिळत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून खान्देशातील
धुळे आणि अमळनेर येथील तमाशाच्या बाजारात सुपाऱ्या दिल्या जात आहेत.
मात्र गावजत्रा नाही. त्यामुळे तमाशालाही अजून परवानगी देण्यात पोलीस
आणि स्थानिक प्रशासन नकारघंटाच वाजवीत आहे.
खान्देशात अमळनेर आणि धुळे येथे तमाशाच्या सुपाऱ्या दिल्या जातात. काही
तमाशा मंडळांना या सुपाऱ्याही मिळत आहे. मात्र ज्या गावात तमाशा
होणार आहे, त्या गावातच पोलीस तमाशाला कोरोनाचे कारण दाखवून परवानगी
नाकारत असल्याचे समोर येत आहे.
खान्देशातील काही तमाशा मंडळांना याबाबतचे अनुभव आले. या तमाशा मंडळांनी
लोककलावंत परिषदेचे विनोद ढगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी
मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल
पाटील यांची भेट घेतली. त्यांना परिस्थितीची माहितीही करून देण्यात
आली. त्यानंतर लवकरच याबाबत सर्व पातळ्यांवर पत्र पाठवले जाईल, असे आश्वासनही
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कलावंतांना दिले.
तमाशाला अजूनही नकारघंटाच
काही दिवसांपूर्वी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पत्र देऊन सर्व जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना तमाशाला कोरोनाच्या नियमांचे पालन करून परवानगी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अजूनही कोरोनामुळे गावजत्रा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे तमाशाची सुपारीही फारशी मिळत नाही.
काही ठिकाणी जत्रा नसली तरी तमाशा केला जातो. तेथे परवानगी मिळविण्यासाठी तमाशा फडाच्या मालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.