जळगाव : जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या काळात विशेष कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी या काळात सरकारी रेशन दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या तीन दिवसांमध्ये ज्या दुकानांचे वाटप झालेले नव्हते त्यांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. तसेच जिल्हा पुरवठा विभागाने मार्च महिन्याचे वाटप पूर्ण केले असून आता एप्रिलच्या वाटपाची सुरुवात करण्यात आली आहे.
या जनता कर्फ्यूच्या काळात जळगाव जिल्हाभरात सर्वच बाजारपेठ, भाजी विक्री इतर सर्व व्यवसाय आणि व्यापार बंद करण्यात आला होता; मात्र असे असतानाच गरीब जनतेला अन्नधान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच पत्र देऊन ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यात जिल्ह्यात अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य तर पीएचएच कार्डधारकाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. त्यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जाते.