-भूषण श्रीखंडे
जळगाव : रक्षाबंधनाचा सण अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त जळगाव शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या व्यापाऱ्यांनी सुरत, इंदौर, अहमदाबाद येथून आणल्या आहे. या राख्या बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, अजूनही म्हणावा तसा खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
भावाच्या व बहिणीच्या नात्याचे बंध बांधणारा राखीपौर्णिमा सण ३० ऑगस्टला आहे. हे नाते अधिक घट्ट करणासाठी राख्यांचे विशेष महत्त्व असते. जळगाव शहरातील होलसेल राखी बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या राखी विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी, डायमंड राखी, वुलन आदी राख्या बाजारामध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा राख्यांच्या दरात पाच टक्के वाढ झालेली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या राखी आवडी निवडीप्रमाणे बहिणीकडून खरेदी केल्या जातात. त्यासाठी जळगावच्या बाजारपेठेत विविध प्रकारचे राख्या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. रुद्राक्ष, मोती, मनी, स्टोन, ओम, स्वस्तिक, पेंडल, ब्रासलेट पद्धतीची राखी या १० रुपयांपासून ते १४० ते १६० रुपये डझन अशा विविध प्रकारच्या राख्या विक्रेत्यांकडे आहे.
छोटा भीम, लिटील क्रिष्णा राखीला मागणी
लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टूनच्या राख्या विविध प्रकारात बाजारात आल्या आहे. यात छोटा भीम, लिटील क्रिष्णा, टेडी बेअर, लाईट व म्युझिकची राखी, विविध रंगामध्ये कार्टूनचे चित्रे असलेल्या राख्या १० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत आहे.
ग्राहकांची संख्या कमी
मागील वर्षी २६ जानेवारी पासूनच बाजारात राख्या घेण्यासाठी महिलांची गर्दी होती. मात्र यंदा अजून ही बाजारात राख्या खरेदीला महिलांची प्रतिसाद कमी दिसत आहे.
ऑनलाईन राख्या खरेदीकडे महिलांचा कल
अनेक ऑनलाईन वस्तू विक्रीच्या साईटवर राख्यादेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाईन राख्या खरेदीला देखील महिलांचा कल वाढलेला असल्याने बाजारपेठेत याचा परिणाम दिसत आहे.
राखीपौर्णिमेसाठी बाजारपेठेत आम्ही विविध प्रकारच्या राख्या बाजारात ग्राहकांसाठी आणल्या आहे. परंतू यंदा महिलांची राख्या खरेदीला खुपच कमी प्रतिसाद दिसत आहे. सात दिवस रक्षाबंधनाला बाकी असून लवकरच ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत दिसेल.रमेश कुकरेजा- राखी विक्रेते