लग्न ही संकल्पना सक्षम केली ती संस्काराने़ म्हणूनच लग्नसंस्कार हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत रूढ आणि प्रचलित झाला़ या लग्न संस्कारातील वर्तमानी महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे लग्नपत्रिका़ बदलल्या जीवन शैलीची सावली लग्नपत्रिकेवर पडणार नाही तर नवलच़ लग्नपत्रिका व कालपरत्वे त्यात झालेले बदल हा मुद्दा विचार करायला व लिहायला भाग पाडणारा झालाय़लग्नपत्रिकेतील ‘वधू’ आणि ‘वर’ हा मुद्दा जन-मानसासाठी व पत्रिकेसाठी गौण होत चालला आहे. ‘प्रेषक, पुण्यस्मरण, आशीर्वाद, प्रमुख पाहुणे, विशेष आतीथी, व्यवस्थापक, संयोजक, किलबिल, स्वागतोत्सुक आणि भाऊबंदकी’ ही विविध सदरं गजबजलेली दिसून येतात़ अशीच एक पत्रिका काल हाती आली आणि यात्रेत हरवलेल्या मुलासारखी माझी स्थिती झाली़ एक, दोन, तीन म्हणत नावांची मोजदाद करीत मी एकशे एक्कावन्न वर- थांबून दीर्घ श्वास घेतला आणि काय हा लोकप्रिय (वधूपिता) माणूस असा विचार मनात तरळून गेला़प्रमुख पाहुण्यांच्या नावानं व यादीनं तर भोवळच आली म्हणा़ महाराष्ट्र राज्याच्या विरोधी नेत्यासह चक्क चार मंत्री, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह पंचायत समीती सदस्य, नगराध्यक्षासह नगरसेवक आणि समाजाध्यक्षासह समाज कार्यकर्ते इत्यादी पाहून-वाचून वाटलं; लग्नकर्त्याचं योगदानही मोठं असावं़ उत्सुकतेपोटी माझं लक्ष वधूपित्याच्या नावाकडे गेलं़ तर कुठल्या तरी निमसरकारी खात्यात लिपीक या पदावर वधूपिता कार्यरत असल्याचं पत्रिकेत नमूद केल्याचं दिसलं असो़मला या नावांच्या जंत्रीविषयी वा नेत्यांच्या नावाविषयी दुस्वास असण्याचं कारणही नाही़ पण या लेखन ऊर्मीचं कारण येथून पुढच्या टप्प्यात येते़ म्हटलं ही नेतेमंडळी दूरच्या वा जवळच्या नात्यात असावी पण तसेही काही आढळले नाही़ वधूपिता राजकीय पक्षीय कार्यकर्ता पण निमसरकारी नोकर म्हणून तीही शक्यता फोल ठरली़ लग्नाची (मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली पण या छापील नावापैकी मंडपात कुणाचीही हजेरी नाही़ आणि माझी अस्वस्थता या निर्विकार वातावरणाने वाढीस मात्र लागली न लागली तोच हाती अक्षदा न मिळाल्यामुळे मी भिरभिरत्या नजरेनं पत्रिकेतील व्यवस्थापक यादीकडे वळलो़ तर बाजूलाच सदर श्रेयनामावलीतील दोन महनीय (ओळखीचे) व्यवस्थापक उभे असल्याचे दिसले आणि हायसे वाटले़अक्षदा मिळाल्या नाहीत़ काय व्यवस्था आहे़ मी पृच्छा केली़ त्या ओळखीच्या दोन्ही इसमांनी काही एक उच्चार न करता अनोळख्यासारखे माझ्याकडे पाहिले़ मी हिरमुसून पत्रिकेतील संयोजकांकडे मोर्चा वळवला आणि संयोजक हाती लागताच अक्षदा मागितल्या़ मलाच मिळाल्या नाहीत, तुम्हाला कुठून देऊ त्याच्या या विधानानं माझी मात्र वाचाच गेली़लग्न बाकी आनंदात झाले़ जेवणावळही नंबर लावून पार पडली़ मीही पत्रिकेमधील १५१ नावं जोजवत घराच्या दिशेनं निघालो़ त्यावेळी वधूपित्याच्या वृथा भाबडेपणाची कीव मात्र मनात साचत गेली आणि कशी फजिती केली, असं म्हणत साक्षात लग्नपत्रिका विराट हास्य करीत मी माझ्या घरी येईपर्यत मनाभोवती मनसोक्त नाचलो़- प्रा.वा.ना.आंधळे, एरंडोल
लग्नपत्रिका आणि तब्बल १५१ नावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:58 AM