जामनेर, जि.जळगाव : प्रेम आंधळे असते हे अनेकदा सिद्ध झाले असून, अशीच घटना जामनेर शहरात घडली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी शिक्षकाच्या प्रेमात पडली व त्या शिक्षकासोबत पळून जावून तिने विवाह केला. लग्न करून दोघे थेट पोलीस ठाण्यात पोहचले. या ठिकाणी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी समजाविले. मुलीला तिच्या आईने विनंती केली, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर मुलगी व मुलगा दोघेही सज्ञान असल्याने पोलीस व कुुटुंबीयदेखील हतबल झाले.ही प्रेम कहाणी ‘ती’ मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुरू झाली. यातील प्रियकर हा त्या महाविद्यालयात तात्पुरत्या नियुक्तीवर प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. येथून या प्रेमकहाणीला बहर आला.हा शिक्षक त्याच्या अशा कारवायांमुळे नोकरीतून बाहेर पडला. मध्यंतरी तो पुण्यास होता, तर त्यानंतर तो जळगावला स्थायिक झाला.या प्रेमकहाणीतील ‘ती’ जामनेरला असली तरी तिचे व त्याचे मोबाईल, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून संपर्क कायम होते.अखेर ती मंगळवारी कुुटुंबीयांना काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली. जवळपास शोध घेऊन ‘ती’ न सापडल्याने पालकांनी पोलीस स्टेशन गाठले.मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ते दोघे पोलिसांसमोर हजर झाले. तिचे कुटुंबीय, शहरातील नातेवाईक, समाजबांधव गोळा झाले. तिला समजाविले. आई तर तिला समजाविताना ढसाढसा रडत होती, पण आंधळ्या प्रेमापुढे ती हतबल ठरली.अखेर तिने त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय पक्का केल्याने कुटुंबीयांनी हात टेकले. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून ती त्याच्यासोबत निघून गेली.
शिक्षकासोबत पळून विद्यार्थिनीने केला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:02 AM
जामनेर : आंधळ्या प्रेमामुळे मुलीचे कुटुंबीय हतबल
ठळक मुद्देमहाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा आंधळ्या प्रेमाच्या घटना ऐकावयास मिळतात, मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवून पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवितात त्या शिक्षकानेच असे करावे हे सूज्ञास अपेक्षित नाही.यात दोष केवळ त्या शिक्षकालाच देता येणार नाही, तर आपली मुलगी कुणाबरोबर किती वेळ बाहेर असते, मोबाईलवर कुणाशी संपर्कात असते यावर लक्ष देण्याची पालकांची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.