कोरोनाचीही लागण : जिजाऊ नगर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलीस अंमलदार असलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून सुरेखा संतोष सोनवणे (३३, रा. जिजाऊ नगर) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान, सुरेखा यांना ज्या रुग्णालयात दाखल केले तेथे कोरोना चाचणी घेण्यात आली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष सोनवणे हे पत्नी सुरेखा, मुलगा यश व मयंक यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगरात वास्तव्याला होते. बुधवारी दुपारी घरी कोणीही नसताना सुरेखा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने सुरेखा हिला खासगी रुग्णालयात हलविले. तिथे गुरुवारी पहाटे २.५५ वाजता सुरेखा यांनी अखेरचा श्वास घेतला. तत्पूर्वी या रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिथून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कदीर तडवी यांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सहा महिन्यांपासून छळ
सुरेखा सोनवणे यांची बहीण तथा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनिषा अर्जुन भालेराव (रा. वाडा, पालघर) यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून बहिणीला पतीकडून त्रास दिला जात होता. तीन महिन्यांपासून तर पतीने कुटुंबियांशी बोलणेही बंद करायला लावले होते. बहीण म्हणून फक्त माझ्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. महिनाभरापासून तिचा मोबाईलही पतीने घेतला होता. या सततच्या त्रासाला कंटाळून सुरेखाने आत्महत्या केली. यासाठी जबाबदार असलेला पती संतोष सोनवणे याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा व अटक करावी, अशी मागणी माहेरच्या कुटुंबियांनी केली. यावेळी भाऊ जितेश शिरसाठ, काका लहू बाबुराव शिरसाठ व सुनील शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपूर) यांनी ज्याने अन्याय केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका पत्रकारांजवळ मांडली. दरम्यान, सुरेखा यांच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे.