भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता अश्विनी किशोर चौधरी (२८) या महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दोन्ही मुलांना विषारी द्रव पाजले असावे असा पोलीस प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे प्रणव (३) व श्रेयस (९) यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. श्रेयसची प्रकृती अद्यापही गंभीर असून लहानगा प्रणव बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली, गुरुवारी दुपारी मृत अश्विनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे खंडाळा परिसरात खळबळ उडाली असून नेमके कारण न समजल्याने याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
अश्विनी चौधरीने गळफास घेतला. हा प्रकार मुलांच्या लक्षात आल्यानंतर ते रडतच बाहेर आल्यानंतर घटनेची उकल झाली तर विवाहितेची मुले प्रणव (३) व श्रेयस (९) हे घराबाहेर येताच उलट्या करीत असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. या चिमुकल्यांना खाण्यातून विषबाधा झाली की त्यांना खाण्यातून काही विषारी द्रव पदार्थ देण्यात आला, या बाबीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस पाटील रतीलाल चौधरी यांनी विवाहितेच्या पतीसह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तेथे पडून असलेल्या काही औषधाच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
अश्विनीचा मृतदेह शववाहिनीद्वारे विच्छेदनासाठी जळगाव येथे दुपारी दोन वाजता हलवण्यात आला तर शवविच्छेदनासाठी बराच वेळ लागल्याने नातेवाइकांनी नाराज व्यक्त केली आहे. दरम्यान, अश्विनीच्या पतीचे शिक्षण एमबीए झाले असून ते फायनान्स बँकेत नोकरीस होते. मात्र कोरोनात त्यांची नोकरी गेल्याने ते घरीच होते. हल्ली ते शेती आणि दुग्ध व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात आले.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, रूपाली चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.