लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मणिपूरमध्ये शहीद झालेले चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
शहीद जवान सागर रामा धनगर यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. यानंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची गावातून अंत्ययात्रा निघाली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमुले. अंत्ययात्रेच्या प्रारंभी तरूणांनी तिरंगा यात्रा काढून आपल्या सुपुत्राला विदाई दिली. अत्यंत शोकाकुल वातावरणात हुतात्मा सागर धनगर यांचा भाऊ अशोक धनगर व पुतण्या देवेंद्र आनंदा धनगर याने पार्थिवाला अग्नीडाग दिला.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, पंचायत समिती सभापती अजय पाटील, माजी सभापती संजय भास्करराव पाटील, दूध संघ संचालक प्रमोद पाटील, दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, प्रा. सुनील निकम, अमोल घोडेस्वार, धनंजय मांडोळे, शेषराव पाटील, दिपक राजपूत यांच्यासह तहसीलदार अमोल मोरे, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
श्रद्धांजलीपर भाषणात आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, जवान आपल्यासाठी शहीद होतात, त्यांचा दोन दिवस दुखवटा आपण पाळतो. मात्र नंतर त्यांच्या कुटुंबियांकडे आपले दुर्लक्ष होते. शहीद जवानांच्या कुटुंबियांना नंतरच्या काळात आधार देणे, वर्ष-सहा महिन्यातून त्यांची विचारपूस करणे, त्या परिवारामागे धिरोदात्तपणे उभे राहणे हीच खऱ्या अर्थाने वीर जवानांना श्रद्धांजली असेल. राज्य व केंद्र शासनाच्या अट व निकषानुसार वीर जवान सागर धनगर यांच्यासह इतर जवानांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील, तांबोळेचे देवाजी जाधव यांनीही श्रद्धांजली मनोगत यावेळी व्यक्त केले.