कोरोना परिणाम : संचारबंदीत दुकाने बंद असल्याने ब्युटी पार्लर व्यवसायिक आर्थिक संकटात
जळगाव : कोरोनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. त्यात शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे
ब्युटी पार्लर व्यवसायिकांचा व्यवसाय १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हे व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
बाजारात खरेदी असो, लग्न समारंभ किंवा बाहेरगावी जायचे असल्यास बहुतांश महिला वर्ग ब्यूटी पार्लर करूनच बाहेर पड्यात. मात्र, कोरोनामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने महिलांचे काही प्रमाणात ब्युटी पार्लर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजरातून ब्युटी पार्लरच्या सामानाची मागणी कमी झाल्यामुळे कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. परिणामी याचा होलसेल कॉस्मेटिकचा व्यवसाय करणाऱ्यांवर आणि दुसरीकडे दुकाने बंद असल्याने ब्युटी पार्लर करणाऱ्या व्यवसायिकांवरही झाला आहे. सध्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसराई सुरू असली तरी, ज्या महिलांना ब्युटी पार्लर करायची इच्छा असते, त्या महिलांनाही दुकाने बंद असल्यामुळे आपल्या इच्छा-आकांक्षाना मुरड घालावी लागत आहे. जळगाव शहरात आजच्या स्थितीला ५०० ते ६०० ब्युटी पार्लर व्यावसायिक असून, या सर्वांना संचारबंदीचा चांगलाच फटका बसला आहे. ऐन लग्नसराईत दुकाने बंद असल्याने, दुकानाचे भाडे कसे भरावे, असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर पडला आहे.
इन्फो :
मास्कच्या वापरामुळे कॉस्मेटिकच्या विक्रीवरही परिणाम झाला असून, त्यात कोरोनामुळे संचार बंदी लागू करण्यात आल्याने पंधरा दिवसांपासून दुकानही बंद आहे. यामुळे लाखो रुपयांचा माल पडून आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाडे व इतर खर्च कसा काढणार, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शासनाने आम्हालाही अटी-शर्ती ठेवून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
प्रथम जैन, कॉस्मेटिक व्यावसायिक
इन्फो :
संचारबंदीमुळे दुकाने बंद असल्याने, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने संचारबंदीच्या काळात ज्या प्रमाणे इतर छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली. त्या प्रमाणेही आम्हालाही मदत करावी किंवा आम्हालाही अटी-शर्ती ठेवून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.
लीना पाटील, ब्युटी पार्लर, व्यावसायिक
इन्फो :
कोरोनामुळे लग्न सराई साध्या पद्धतीने होत असल्यामुळे, ब्युटी पार्लरच्या व्यावसायावरही काहीसा परिणाम झालेला आहे. त्यात शासनाने दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश काढल्यामुळे व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे आता दुकानाचे भाडे भरण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. शासनाने इतर व्यावसायिकांप्रमाणे किमान आर्थिक मदत करावी.
प्रतिभा शिंपी, ब्युटी पार्लर व्यावसायिक
इन्फो :
बाहेरगावी जायचे म्हटल्यावर बहुतांश महिला ब्युटी पार्लर, केसांची हेअर डाय, चेहऱ्याची मालिश आदी सौंदर्य खुलविण्यासाठी ब्युटिशियनकडे जावेच लागते. मात्र, आता कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने घरच्या घरीच चेहरा ब्युटिशियन करता आला नाही.
सारिका वाणी, गृहिणी
इन्फो :
लग्नासाठी मला केस काळे करायचे होते. मात्र, कोरोनामुळे ब्युटीपार्लरचे दुकान बंद असल्याने केस काळे करता आले नाहीत. त्यामुळे घरच्या घरीच केस काळे केले.
रजनी पाखले, गृहिणी