जळगाव : उलमा कौन्सिल व मुस्लीम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पावसाच्या आगमनासाठी मुस्लीम बांधवांनी ‘अल्लाह’ला साकडे घातले आणि सामूहिक ‘नमाज ए ईस्तेस्का’ अदा करून दुआ केली.
मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव. अशी प्रार्थना करीत समुदायाने दोघी हात उलटे करून दुआ मागितली. काही संकट आमच्यावर आलेले आहेत. ती संकटे उलथून टाक, म्हणून दोन्ही हात उलटे करून दुआ करण्यात आली.
सुरुवातीला मुफ्ती सलिक सलमान यांनी या नमाजचे महत्त्व सांगितले. मुफ्ती अतीक यांनी अरबी प्रवचन सादर केले. यावेळी उल्मातर्फे मुफ्ती अफजल, ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुक शेख, सचिव अनिस शाह, मोहसीन सैयद आदींची उपस्थिती होती.