लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तरुणांच्या नावावर बनावट फर्म तयार करून कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनी व कोट्यवधींचा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांकडून उघड झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून जे नाव समोर आले आहे, तो सध्या मध्य प्रदेशातून सूत्र हलवित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जळगावात विविध व्यवसाय करीत असताना फायनान्स कंपनी स्थापन केली व तीदेखील बंद पडल्याने तो मध्य प्रदेशात व्यवसाय करीत आहे. यात दोन दिवसांपूर्वी तो जळगावात येऊन गेल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून पिंटू बंडू इटकरे याने घेतलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करीत बोगस कंपनींची नोंदणी करून फसवणूक केल्याची तक्रार पहूर येथील प्रवीण कुमावत व अशोक सखाराम सुरवाडे यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी तक्रार अर्जातून केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यात सुमारे ८४ बनावट फर्मची यादी समोर येत आहे.