लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था अर्थात बीएचआर या संस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मास्टर माइंड सुनील देवकीनंदन झंवर (रा. जयनगर, जळगाव) हा तब्बल ९ महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सकाळी १० वाजता नाशिकमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पंचवटी पोलीस ठाण्यात अटकेची नोंद करून त्याला पुण्यात आणले जात असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी ‘लोकमत’ला दिली.
पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत फसवणुकीचा आकडा १७ लाख ८ हजार ७४२ इतका होता तर आतापर्यंत तपासात ही रक्कम ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कंडारे यालाही सात महिन्यांनंतर २९ जून रोजी इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. कंडारे सध्या कारागृहात आहे. झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन वेळोवेळी फेटाळून लावला होता. झंवर हा वेशांतर करून जळगाव, मुंबई, राजस्थान व इंदूर येथे वावरत होता. ९ महिने पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. सोमवारी रात्रीपासून पुणे पोलिसांनी सापळा लावला होता.