यंदा तुनं दहावीनं वर्ष. नीट अभ्यास कर. पास व्हयना तर ठीक. नाईतं वावरमा काम करनं पडीन. ध्यानमा ठेव. आत्याचं हे बोलणं. अधूनमधून ती असं बोलायची. ऐकून ऐकून पाठ झालं होतं. ते डोक्यात फिटसुद्धा करून ठेवलं होतं.कारणही तसंच होतं. माझं दहावीचं वर्ष. बोर्डाची परीक्षा. अत्यंत महत्त्वाचं वर्ष. अत्यंत महत्त्वाचं वर्ष. तेव्हा दहावीच्या मार्कांना अतोनात महत्त्व. त्यावरच आयुष्याची पुढील दिशा ठरायची. मार्क चांगले तर ठीक, नाही तं काही खरं नाही. एखादा जर नापास झालाच, तर मग त्याचे हाल खात नाही, असं लोक म्हणायचे. नापास मुलाच्या आॅक्टोबरच्या वाऱ्यावर वाºया. त्यातून सुटका होणं खूपच अवघड, अशी वाºया करणारी अनेक मुलं मी पाहिली होती. आमच्या गल्लीत तर डझनभर होती.आमचं घर छोटं. अभ्यासाला स्वतंत्र जागा नव्हती. त्यावर मी एक उपाय शोधला. धाब्यावर एक खाट घेऊन गेलो. सान्याजवळ तिला दोन काठ्या लावून उभी केली. त्याला पोते लावून झोपडी बनवली. हीच अभ्यासिका.राणे सरांचं रात्रीचं जेवण आटोपलं की ते गच्चीवर यायचे. मी त्यांना बल्बमध्ये अभ्यास करताना दिसायचो. एके दिवशी त्यांनी क्लास सुटल्यावर थांबायला सांगितलं.एकट्याला का बरं थांबवलं असेल? कुणी तक्रार केली असेल का? होमवर्क तर रोजच करतो. तेवढ्या वेळात अनेक प्रश्न मनात भिरभिरले. तेवढ्यात सर आले. ते म्हणाले, तुला दररोज रात्री धाब्यावर अभ्यास करताना पाहतो. तुझ्या घरात अभ्यासाला जागा नाही का? काय उत्तर द्यावं, कळेना. खरं सांगणं भाग होतं. नाही सर, आमचं घर छोटं हेना. बरं.. बरं.. मग तू असं कर, आजपास्नं आपल्या क्लासमध्येच अभ्यास करत जा. सायंकाळी सातनंतर क्लासरूम तशी रिकामीच असते. सकाळी मात्र तुला साडेचार वाजता उठावं लागेल. आहे कबूल? मी लगेच हो म्हटलं. संध्याकाळी येताना अंथरुण पांघरुण घेऊन ये. वर पडतीवर ठेव. खुललेल्या चेहºयासह म्हणालो, ठीक आहे सर.घरच्यांना राणे सरांचा निरोप दिला. आत्या म्हणाली, एकटादुकटा कसा राहशील तू? त्यापेक्षा घरीच अभ्यास कर. मी म्हणालो, धाब्यावर नीट अभ्यास होत नाही. मी मनाशी ठरवलं. मी जाणारच. आता यापुढचा अभ्यास राणे सरांकडेच.अभ्यास सुरू झाला.बेंचवर बसून अभ्यासाची मज्जाच न्यारी. ट्यूबचा उजेड. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. थंडगार हवा. रिकामे बेंच. क्लासमध्ये एकटाच. समोर मोठा फळा. संपूर्ण क्लासमध्ये माझंच राज्य. भारी वाटायचं. बसून बसून कंटाळा आला तर फळ्यावर उदाहरणं सोडवायचो. स्वत:च स्वत:ला समजावून सांगायचो. सगळा भन्नाट प्रकार.आता अभ्यासाचं समाधान मिळू लागलं. वर्गामध्ये सरांनी विचारलेल्या प्रश्नांची फटाफट उत्तरं देऊ लागलो. अभ्यासाची बातमी इतर मित्रांना समजली. केशवला समजली. त्यानेही सरांकडे वशिला लावला. तोही क्लासमध्ये अभ्यासासाठी दाखल. मग महेंद्र, भावेश, बाप्पा, भिक्या यांनीही सरांना विनंती केली. विनंती मान्य. मग बेंच भरू लागले. जणू रात्रीची अभ्यासिका.भल्या पहाटे राणे सर यायचे. झोपेतून आम्हाला उठवायचे. त्यांचा नित्यनेम कधीच चुकला नाही.सकाळी सहा वाजल्यापास्नं क्लास सुरू.ओपन थिएटरमध्ये नवीन पिक्चर लागायचा. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी व्हायची. बाप्पा, मंगेश, महेंद्र हे पिक्चरचे शौकिन. नव्या पिक्चरचा पहिला दिवसाचा पहिला शो त्यांनी कधीच बुडवला नव्हता. आता मात्र त्यांची आली का पंचाईत. क्लासमधून निघता येईना. त्यादिवशी सर कुठेतरी बाहेर गेले होते. कारण स्कूटर जागेवर नव्हती. आम्हाला वाटलं, गावी गेले असतील. प्रवीणला आम्ही क्लासमध्येच ठेवून सर्वजण ओपन थिएटरकडे. संगत गुणाचा परिणाम. पैसे कुणाकडेच नव्हते. थिएटरच्या मागच्या बाजूला तारेचं कंपाऊंड. कंपाऊंडला लागून लोखंडी पत्रे लावलेले. लोखंडी पत्रा आधीच कुणीतरी वाकवलेला. थोडी जमीन खोदून चोरासारखं आत जाता येत होतं. एक-एक करत आम्ही सरपटत गुपचूप शिरलो. पिक्चर सुरू होऊन बराच वेळ झालेला. पडद्याजवळ बसलो. रेतीवर. बसून पिक्चर पाहणं सुरू. प्रचंड धाकधूक. पिक्चरकडेही लक्ष नसायचं. कुणी आपल्याला पकडेल का? तिकीट चेक करतील का? क्लासमध्ये गेल्यावर राणे सरांना समजलं तर? गल्लीतलं कुणी मला पाहिलं तर? अनेक प्रश्न भेडसावू लागले. एकदाचा सिनेमा संपला. धावत पळत क्लासवर. गुपचूप आम्ही जिन्यावर चढलो. चोरासारखे दरवाजा लोटला. लाईट सुरूच. पंखे सुरू. छातीवर पुस्तक ठेवून प्रवीण ढाराढूर. कसाबसा थोडा फार अभ्यास केला. लाईट बंद करून आम्ही निवांत झोपलो.दुसºया दिवशी सरांना कुठून तरी समजले. मग एकेकाची झाडाझडती झाली.दिवस कसे भराभर सरत होते. टेस्ट पेपर येत-जात होते. मार्कांचा आलेख उंचावत होता. आत्मविश्वास बळावला. अभ्यासावर पकड बसवली. हळूहळू अभ्यास आवाक्यात येत होता. बोर्डाची परीक्षा म्हणून एक अनामिक ओझं डोक्यावर होतं. परीक्षेचा ताण होताच. नाही असं नाही. पण काही असो. अभ्यास सुरू होता.मी सायंकाळी डबा घेऊन शेतात. वडील बांधावर आलेले असायचे. मग ते अभ्यासाविषयी तपास करायचे. चांगला अभ्यास करत ºहाय. पुस्तक वाचत जाय. जीव ओतीसन अभ्यास कर. कष्ट कराले घाबरजो नको. पास व्हयाले पाईजे. मी मानेनं होकार द्यायचो. सायकलीवर टांग मारली की थेट क्लासमध्येच.बोर्डाची परीक्षा सुरू झाली.पहिला पेपर मराठीचा. सोप्पा पेपर. दणकून पेपर सोडविला. काही मुलं मात्र मराठीच्या पेपरसाठी गाईडातली पानंच्या पानं फाडून आलेली. पंधरा पंधरा मिनिटांनी मुतारीत जायची. एखादं चिटोरं घेऊन यायची. घाबरत घाबरत इकडं तिकडं पाहत पेपर सोडवायची. पर्यवेक्षकांना दिसलं की कॉपी जमा. कधी कधी पेपरपण जमा व्हायचा.दिवस इंग्रजी पेपरचा. पालकांची अतोनात गर्दी. साºयांचे पालक हजर. भाझे भाऊ व वडील शेतात. भाऊ सकाळी म्हटला होता. आज इंग्रजीचा पेपर. चांगला लिहजो. कोणी कॉपी दिधी तरी लेवानी नई, चांगला पेपर लिहजो.शिपायाने घंटा वाजवली. पेपर सुरू.पोलिसांनी पालकांच्या गर्दीला गेटबाहेर पांगवलं. दहा-पंधरा मिनिटंसुद्धा झाली नसतील. तेवढ्यात शिपाई धावत धावत वर्गात. म्हणाला, गाडी आली. आमच्या वर्गातून दुसºया वर्गात. मग तिसºया वर्गात. प्रत्येक वर्गात तोच निरोप. गाडी आली. गाडी आली. पर्यवेक्षक खाडकन् खुर्चीवरून उठले. मुलांना म्हणाले, पोरांनो, बोर्डाची गाडी आली बरं का. ज्या मुलांनी गाईडची पानं फाडून चड्डीत, पायाजवळ, कमरेजवळ लपवलेली. धडाधड बाहेर काढली. खिडकीतून बाहेर फेकली. घाम फुटला त्या पोरांना. मग बोर्डाची माणसं वर्गात दाखल. याला तपास. त्याला तपास. कंपासपेटी बघ. रायटींग पॅड उचलून बघ. खिसा तपास. धडाधड तपासणी. तपासणी. तपासणी. दोनचार परीक्षार्थींना उभं करून खांद्यापासून पायापर्यंत तपासलं. वर्गात एकामागोमाग दोन राऊंड.मग दुसरा वर्ग. त्यातपण तशीच तपासणी. एक-दोन मुलांवर कॉपी केस. बोर्ड जिंदाबाद. एक-एक करत सर्व पेपर संपले. जीव भांड्यात पडला. मग मी दोन-चार दिवस प्रत्येक प्रश्नपत्रिका काढायचो. सोडवलेल्या प्रश्नांचा हिशेब. मार्कांचा हिशेब करत बसायचो. रोज एकच कार्यक्रम. ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पहायला काय हरकत नव्हती. बेरीज करून खुश व्हायचो. बोर्डाचे पेपर तसे लिहीले होते. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर संपल्याबरोबर फुलपट्टीने रेषा मार. समास सोड. टापटीप. चकाचक हस्ताक्षर. अक्षरांना टोप्या. केलेला सराव कामी आला. शेवटी एकदाचा बोर्डाने निकाल जाहीर केला. मी दहावी पास. प्रथम श्रेणीत. अठ्ठ्याहत्तर टक्के गुण. पेपरात फोटो. शाळेतले शिक्षक फुलांचा बुके घेऊन थेट घरी. माझा सत्कार समारंभ. सरांनी मला पेढा भरवला. अखेर आमच्या समस्त भाऊबंदकीचा मॅट्रीक नापास होण्याचा पायंडा मी मोडला. घरात आनंद दाटला. याचं श्रेय माझ्या घरच्यांना अन् राणेसरांना. क्लासरूम माझ्या डोळ्यासमोर फिरू लागली.वडिलांना गहिवरून आलं. त्यांचे डोळे भरून आले. नवी उमेद ते माझ्यात पाहत होते. त्यांचे आनंदाचे अश्रू पाहिले आणि..... माझ्याही डोळ्यातून आनंदाश्रू पडू लागले.-आबा गोविंद महाजन, जळगाव
मॅट्रीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 2:32 PM