लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्राम पंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीचा समावेश होता. तालुक्यातील अनेक गावांमध्ये धक्कादायक निकाल लागलेले पहायला मिळाले. अनेक दिग्गजांना पराभवाची हवा खावी लागली, तर अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना जनतेने नाकारलेले दिसून आले. तर फुपनगरी, आव्हाणे, ममुराबाद, कठोरा, नांद्रा, गाढोदा अशा गावांमध्ये अनेक युवा उमेदवारांनी ग्राम पंचायतीत प्रवेश करून, ज्येष्ठांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. शिरसोली, आसोदा, कानळदा, आव्हाणे या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये देखील अनेक उलटफेर पहायला मिळाले व अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कानळद्यात शिवसेना व भाजपच्या तालुका प्रमुखांचा पराभव झाला. तर त्यामुळे दोन्ही ही पक्षांच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या पॅनलला कानळद्यात एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. आसोद्यात मतदारांनी रवी देशमुख यांना पराभवाचा धक्का दिला. आसोद्यात तुषार महाजन यांच्या आसोदा विकास पॅनलले बहूमत मिळवत सत्ता काबीज केली. मात्र, सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर शिरसोली प्र.न.मध्ये अनिल बारकू पाटील यांच्या पॅनलला सर्वाधिक १४ जागा मिळाल्या, शिरसोली प्र.बो मध्ये बारी पंचमंडळाच्या पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. तर आव्हाणे येथे पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र, माजी सरपंच विजय दत्तात्रय पाटील यांनी तब्बल २०० मतांनी विजय मिळवत गावात आपले वर्चस्व पुन्हा सिध्द केले. गाढोदा येथे पारंपरिक प्रतीस्पर्धी असलेल्या गोपाळ फकीरचंद पाटील व रामचंद्र सीताराम पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये गोपाळ पाटील यांनी आपले वर्चस्व पुन्हा सिध्द केले. तर भादली येथे तृतीयपंथी अंजली पाटील यांनी मिळवलेला विजय हा ऐतिहासीक ठरला. दरम्यान, सरपंच पदाचे आरक्षण न निघाल्याने उत्सुकता कायम असून,आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुन्हा समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.