जनजीवन प्रभावीत : दुपारी रस्ते निर्मनुष्य
जळगाव : यंदा मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा बसू लागला आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. हातावर पोट असणा:या कष्टकरी, मजूर यांना त्याचा अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे. कमाल तापमान 43 अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच पुढील काळात तापमान 45 ते 48 अंश सेल्सीअसवर पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
साधारणत: मे महिन्यात उन्हाचा पारा 43 ते 44 अंश सेल्सीअसवर पोहचतो. मे महिना म्हणजेच कहर, असे म्हटले जाते. यंदा मार्च महिन्यात सुरुवातीला थंड वातावरण होते. सायंकाळनंतर गारवाही जाणवत होता. अगदी 17 ते 18 मार्चर्पयत वातावरण फारसे उष्ण नव्हते. पण 21 मार्चपासून वातावरण तापू लागले. त्याचा फटका बालक, वृद्ध, रुग्ण यांना अधिकचा सहन करावा लागत आहे. गुरुवारी 43 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक 46.7 अंश सेल्सीअस तापमानाची 2009 मध्ये नोंद
हवामानशास्त्र विभागानुसार गेले पाच वर्षे मे महिन्यात कमाल तापमान अन्य महिन्यांच्या तुलनेत अधिक होते. 1 मे 2009 रोजी 46.7 र्पयत कमाल तापमान होते. गेल्या पाच वर्षामधील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आहे. किमान तापमान 15 व कमाल तापमान 40 सेंटीग्रेड असल्यास पिके, सजीव यांच्यासाठी सुकर वातावरण मानले जाते. पण वर्षातील 365 दिवसांमध्ये 60 पेक्षा अधिक दिवस कमाल तापमान 40 सेंटीग्रेडर्पयत व अनेकदा त्या पेक्षा अधिक राहत असल्याचा अनुभव तज्ज्ञांना अलीकडच्या दोन वर्षांत आला आहे. पर्यावरणाचा वर्षागणिक ढासळणारा समतोल तापमानातील चढ-उतारास किंवा ग्लोबल वॉर्मिगला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवामानशास्त्र विभागाचा सतर्कतेचा इशारा
येत्या चार ते पाच दिवसात पारा 42 अंश किंवा यापेक्षा अधिक राहू शकतो. त्यात 31 रोजी 43 अंश, 1 एप्रिल रोजी 42.8 अंश, 2 एप्रिल रोजी 42.9 अंश, 3 एप्रिल रोजी 43.1 अंश, 4 एप्रिल रोजी 43.00 अंश सेल्सीअस तापमान राहू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.