जळगाव : शहर मनपावर शिवसेनेचा प्रथम महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या, तेव्हा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कोरोना संसर्गाने विलगीकरणात होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर, पालकमंत्री जळगावात दाखल झाले असून, महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.
कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला. राज्यात महाआघाडी सरकार असून, पालकमंत्री नात्याने आपण जळगाव शहराच्या विकासासाठी काय करू शकतो. भविष्यात विकासकामांचे आणि निधीसाठी कसे नियोजन करता येईल, याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.