जळगाव : मनपाच्या २०१३ मधील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास १४ दिवसांची मुदत असताना प्रभारी महापौर गणेश सोनवणे यांनी अचानक नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली २०१३ मधील सदस्यांची होणारी शेवटची महासभा रद्द होण्याची शक्यता आहे. सोनवणे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत आला आहे.मंगळवारी दुपारी १२.२५ वाजता गणेश सोनवणे यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोन ओळीच्या राजीनाम्यात सोनवणे यांनी काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या कारणाचा उल्लेख त्यांनी आपल्या राजीनाम्यात केलेला नाही. तसेच आयुक्त ांशी चर्चा करताना त्यांनी प्रकृती अस्वस्थाचे देखील कारण दिले आहे. प्रभारी महापौरपदाच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच महासभा होणार असल्याने गणेश सोनवणे हे उत्साही होते. तसेच महासभा घेण्यात यावी यासाठी आग्रही होते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर ललित कोल्हे यांनी मनसेमधून भाजपात प्रवेश केल्याने त्यांनी ८ जुलै रोजी आपल्या महापौर व नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमहापौर गणेश सोनवणे यांच्याकडे प्रभारी महापौरपदाची जबाबदारी होती.कैलास सोनवणे यांना शह देण्यासाठी खेळी?गणेश सोनवणे यांनी अचानक राजीनामा दिल्याने शहरात चर्चेला ऊत आला आहे. माजी नगरसेवक कैलास सोनवणे त्यांच्या पत्नी भारती यांना महापौरपद मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. तसेच आमदार सुरेश भोळे हे देखील सीमा भोळे यांच्यासाठी आग्रही आहेत.कैलास सोनवणे व गणेश सोनवणे यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे गणेश सोनवणे यांना भाजपात खेचत कैलास सोनवणेंना शह देण्यासाठी आमदार भोळे यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे..राजीनामा देणारे २८ वे नगरसेवकनिवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदल केल्यामुळे ७५ पैकी २७ नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवारी गणेश सोनवणे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देणारे २८ वे नगरसेवक ठरले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त दुपारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती व्हायरल केली.स्थायी व महासभा रद्द होण्याची शक्यता११ सप्टेंबर रोजी विविध योजना व कामांच्या मंजुरीसाठी मनपा प्रशासनाकडून महासभा घेण्यात येणार होती. मात्र, आता प्रभारी महापौरांनी राजीनामा दिल्याने महासभा होईल की नाही ? याबाबत संभ्रम आहे. तसेच महापौर किंवा उपमहापौर नसताना स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली महासभा होवू शकते. याबाबत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांना विचारले असता अभ्यास करुन निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.भाजपाने सोनवणेंना दिली स्विकृत नगरसेवकपदाची ‘आॅफर’... मनपा प्रशासनाकडून काही महत्वाचा कामांच्या मंजुरीसाठी ही महासभा घेण्यात येणार होती. मात्र, या कामांना महासभेत मंजुरी न मिळता नवीन सदस्यांच्या उपस्थितीत पहिल्या महासभेतच ही मंजुरी मिळावी यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु होते. यासाठीच गणेश सोनवणे यांना राजीनामा देण्याची विनंती भाजपाकडून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सोनवणे यांना स्विकृत नगरसेवक पदाची आॅफर देखील देण्यात आली. अशीही चर्चा मनपात रंगली होती. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी ही महासभा होणार होती. मात्र, प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे यांनी प्रभारी महापौरांना पत्र पाठवून तांत्रिक कारणाचा हवाला देत ही महासभा ११ रोजी घेण्याची विनंती केली होती. यामुळे गणेश सोनवणे नाराज झाल्याचीही चर्चा मनपात होती.माझ्या वैयक्तिक कारणांसाठी मी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच कु ठलीही नाराजी किंवा राग नाही. गेल्या महिनाभरापासून तब्येत ठिक नव्हती त्यामुळे मी राजीनामा दिला आहे.-गणेश सोनवणे, प्रभारी महापौर
जळगाव मनपाच्या प्रभारी महापौरांनी दिला अचानक राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:02 PM
११ रोजीच्या महासभेबाबत प्रश्नचिन्ह
ठळक मुद्देचर्चेला ऊत