लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने या स्मशानभूमीत लोकसहभागातून महापौर जयश्री महाजन यांनी सात ओटे तयार करून घेतले आहेत. रविवारी चर्चा केल्यानंतर सोमवारी तातडीने महापौरांनी बांधकाम करून घेतले. उर्वरित पाच ओटेदेखील लवकरच मेहरूणच्या स्मशानभूमीत तयार केले जाणार आहेत.
नेरी नाका स्मशानभूमीत आणखी ओटे तयार करावे म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी काही समाजसेवी संस्था आणि व्यक्तींशी संपर्क साधला. महापौरांच्या विनंतीला मान देत श्रीराम खटोड, खुबचंद साहित्या यांनी १२ ओटे तयार करून देण्याचे सांगितले होते. महापौर जयश्री महाजन यांनी सोमवारी स्वतः सायंकाळी स्मशानभूमीत उभे राहून सात ओट्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. यावेळी नगरसेवक सुनील महाजन, सुरेश तलरेजा, खुबचंद साहित्या, आदी उपस्थित होते.