जळगाव- शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी देखील शुक्रवारी लस घेतली. जेष्ठ नागरिक आणि इतर पात्र नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरणाला महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जात आहे.
वनकर्मचाऱ्यांना सुविधा द्या
जळगाव - यावल अभयारण्यातील व इतर विभागातील वनकर्मचारी जीवाशी खेळून अवैध शिकार, वृक्षतोड रोखण्यासाठी जंगलात काम करत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना योग्य सुविधा मिळत नसून त्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतीत मुख्यमंत्री कार्यालयाकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या इमेलला उत्तर देण्यात आले असून, याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी लस उपलब्ध करा
जळगाव - कोरोना काळात शहरातील ज्या संस्था, लोकप्रतिनिधी, समाजसेवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस नागरिकांना सेवा पुरवली होती. यात अन्न, धान्य, वस्तू, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला होता. अशा सर्व संस्था, समाजसेवक, लोकप्रतिनिधींसाठी प्रशासनाने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनपाचे स्विकृत नगरसेवक महेश चौधरी यांनी केली आहे. याबाबत चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
वेतन आयोग लागू करण्यासाठी हप्ते
जळगाव - गेल्या अनेक वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्य प्रतीक्षेत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांकडून वेतन आयोग लागू करण्यासाठी पाचशे ते हजार रूपये उकळले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे. याबाबतीत त्यांनी मनपा आयुक्तांकहे तक्रार केली आहे. शासनाला हप्ता देण्यासाठी ही वसुली मोहिम सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा विभाग प्रमुख राजेंद्र पाटील यांनी केला असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हद्दवाढीविरोधात आव्हाणेकर घेणार महापौरांची भेट
जळगाव - मनपाच्या महासभेत सत्ताधारी भाजपने आव्हाणे गावासह चार गावे मनपा हद्दीत घेण्याचा ठराव केला होता. हा ठराव रद्द करून, या गावांचा समावेश मनपात करू नये या मागणीसाठी आव्हाणे ग्रामस्थ व काही ग्राम पंचायत सदस्य सोमवारी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभपती राजेंद्र् घुगे-पाटील यांची भेट घेणार आहेत.