लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या रविवारी होत असलेल्या १८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत शिवसेनेच्या पहिल्या महापौर जयश्री महाजन या सोमवारी महापौरपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. यासाठी शिवसेनेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून, महापालिका भगव्या रंगाने सजविण्यात आली आहे. भगव्या रंगाने विद्युत रोषणाई व भगवे ध्वज रस्त्याच्या बाजूने लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही सजविण्यात आले आहे.
जयश्री महाजन या सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरील आपल्या दालनात सूत्रे हाती घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरांचे कार्यालय १७ व्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आणण्यात आले होते. मात्र, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन शिवसेनेत परत सतराव्या मजल्यावर परत महापौरांचे कार्यालय आणले आहे. महापौरांच्या कारभार स्वीकारण्याचा कार्यक्रमदेखील दांडग्या पद्धतीने करण्यात येणार असून, शिवसेनेचे अनेक नेते व आमदारदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंतदेखील शहरात दाखल झाले आहेत.माजी महापौर रमेशदादा जैन यांनी त्यांचे स्वागत केले. रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पालकर हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेच्या पहिल्याच महापौर
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर जयश्री महाजन या शिवसेनेच्या पहिल्याच महापौर ठरणार आहेत. माजी मंत्री सुरेश दादा जैन हे जरी शिवसेनेचे होते, तरी त्यावेळी खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात असल्याने अधिकृतरीत्या महापालिकेत शिवसेनेला महापौरपद मिळाले नव्हते. शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी महापौरपद हे सूत्र स्वीकारण्याचा कार्यक्रमदेखील भगवामय करण्यात येईल, असे सांगितले. यासह अठराव्या मजल्यावरदेखील शिवसेनेकडून भगवा ध्वज लावण्यात येणार असल्याचीही माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
वर्धापनदिनाचे साधले औचित्य
२१ मार्च २००३ रोजी जळगाव नगरपालिका बरखास्त करण्यात येऊन महापालिका स्थापनेची घोषणा झाली होती. २२ मार्च रोजी प्रशासक संजय मुखर्जी यांनी मनपाच्या प्रशासकपदाचा पदभार घेतला होता. त्यामुळे दरवर्षी २१ मार्च रोजी रात्री मनपाच्या सतरा मजली इमारतीवर रोषणाई करण्यात येते. यंदा हेच औचित्य साधत सेनेच्या पहिल्या महापौरांनी शपथविधीसाठी प्रतिक्षा केल्याचे समजते. वास्तविक निवड झाली त्या दिवशी महापौर जळगावातच होत्या. उपमहापौरांनी ठाण्याहून येऊन निवडीच्या दुसऱ्याच दिवशी पदभार स्विकारला. मात्र महापौरांनी या वर्धापनदिन मुहूर्ताचे औचित्य साधल्याचे दिसून आले. त्यासाठी सतरा मजलीवर भगव्या रंगातील रोषणाई करण्यात आली असून परिसरही भगवामय करण्यात आला आहे.