सतीश चोरडिया
नरडाणा, दि.29 : नाशिक ते पाष्टे (ता.शिंदखेडा) हे तब्बल 275 कि.मी.चे अंतर मयूरी संजय चोरडिया (18) हिने सायकलने चौदा तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता नाशिकहून निघालेली मयूरी मंगळवारी सकाळी 8 वाजता पाष्टे येथे पोहचली.पाष्टे गावात तिचे आगमन होताच, तिने गौसिया मातेचे दर्शन घेतले. यानिमित्त पाष्टे ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
मयूरी चोरडिया ही मूळची पाष्टे गावाची आहे. परंतु, आठ वर्षापूर्वी तिचे वडील संजय चोरडिया हे व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झाले. मयूरीला सुरुवातीपासून सायकलिंग करण्याची विशेष आवड आहे. ती सध्या नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहे. आतार्पयत तिने नाशिक येथे आयोजित सायकल रेसिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध पारितोषिके पटकावली आहेत. भुजबळ फाउंडेशनतर्फे आयोजित 80 कि.मी. सायकल स्पर्धेत मयूरीने 200 स्पर्धकांमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्या वेळी तिला 31 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले होते, त्यातून 18 हजार रुपयांची नवीन सायकल विकत घेतली व सायकल चालविण्याचा सराव सुरू ठेवला. नाशिक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या 20 कि. मी. सायकल स्पर्धेत तीने यश मिळविले. एवढेच नव्हे तर नाशिक ते पंढरपूर हे 348 कि.मी.चा प्रवासही तीने सायकलनेच केला आहे.
असा केला प्रवास
मयूरी ही सोमवारी सायंकाळी सहा वाजता नाशिक येथून निघाली. मध्यंतरी तिने तीन तास आराम केला. त्यानंतर रात्रभर सायकल चालवली. मालेगाव (जि. नाशिक) येथे ती आली असताना, ती बायपासने न येता मालेगाव शहरातून आली. त्यामुळे पाष्टे गावात मंगळवारी सकाळी 8 वाजता तिचे आगमन झाले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाचे ध्येय
मयूरीने सायकल रेसिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यादृष्टीने ती दररोज 50 ते 70 कि. मी. सायकल चालवून सराव करत आहे. प्रशिक्षक मधुकर खैरनार तिला प्रशिक्षण देत आहे.
ग्रामस्थांतर्फे सत्कार
मंगळवारी मयूरी चोरडिया तिच्या मूळगावी पाष्टे येथे आल्यानंतर सरपंच प्रतिभा ठाकरे, रवींद्र ठाकरे, जगन्नाथ कोळी, माजी सरपंच मोतीलाल वाकडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिचा सत्कार झाला.