लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून नऊ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले.
‘एमडी’ विक्री करणाऱ्या इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती (रा. शाहु नगर, जळगाव) याच्यासह त्याला पुरवठा करणारा गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (४०, रा. कंजरवाडा) या दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवार, २१ मार्च रोजी मध्यरात्री शाहूनगर परिसरात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे ७२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ९१० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री जळगाव येथेदेखील कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या विषयी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवार, २२ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी उपस्थित होते.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सुधीर सावळे यांना माहिती मिळाली की, शाहू नगर परिसरात इम्रान भिस्ती हा एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापला रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला ताब्यात घेतले.
विक्रीसाठी तयार पुड्यांसह साठा जप्तइम्रान याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे नऊ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. यामध्ये विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीमध्ये तयार करून आणलेल्या १.३९ ग्रॅम वजनाच्या तीन पुड्यांसह ८५.४२ ग्रॅम व ३५.४१ ग्रॅम असे वेगवेगळे ठेवलेले पावडर स्वरुपातील एमडी पोलिसांनी हस्तगत गेले. या सोबतच आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण नऊ लाख ८५ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुरवठादारही जाळ्यात विक्रीसाठी आणलेले अमली पदार्थ कोठून आणले याविषयी चौकशी करत असताना हा साठा गोकूळ उमप याच्याकडून घेतल्याची माहिती इम्रानने दिली. त्यानुसार उमप यालाही अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.