असोदा रस्त्यावर अतिक्रमण
जळगाव : जळगाव ते असोदा रस्त्यावर चौबे मार्केट ते असोदा रेल्वे गेटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड अतिक्रमण झाल्यामुळे, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच या रस्त्यालगत विद्युत खांब टाकण्यात आल्यामुळे हा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. एकीकडे या रस्त्यावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढत असजाना, दुसरीकडे अतिक्रमणही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतर्फे करण्यात येत आहे.
रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असतानाही, अनेक प्रवासी दादऱ्यावरून स्टेशनात बाहेर न पडता रूळ ओलांडून स्टेशनाच्या बाहेर पडत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी रेल्वे प्रशासनाने रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : गेल्या महिन्यात शनिपेठेत भुयारी गटारींच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, काम आटोपल्यानंतर खड्डे व्यवस्थित न बुजल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात
जळगाव : शहरातील शाहू नगरातील अनियमित साफसफाई होत असल्यामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव होऊन रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे.
शाहू नगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपकडून शाहू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून, दगड-गोटे वर आले आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वाहनधारकांतर्फे करण्यात येत आहे.
सुट्टीच्या दिवशींही वीज बिल भरणा केंद्र सुरू
जळगाव : महावितरणतर्फे सुट्टीच्या दिवशींही वसुली मोहीम सुरू असून, शहरातील दीक्षित वाडीतील वीज बिल भरणा केंद्रही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच अधिकारी-कर्मचारी वर्गही कामावर हजर होते. दिवसभरात या ठिकाणी अनेक ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा केला.