लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोविडमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ माध्यमातून १९ एप्रिलपासून विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. परंतु सद्य स्थितीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील वातावरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
अनेक विद्यार्थी व कुटुंबातील सदस्य कोविड सदृश आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचा विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने विचार करत आगामी काळात होणाऱ्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात याव्यात व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशीही मागणी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे.