सध्याचा काळ हा सर्वांसाठीच कठीण आहे. मात्र डॉक्टर सातत्याने रुग्णसेवा देत आहे. हा व्यवसाय असला तरी तो सेवाभावी वृत्तीने करण्याचा आहे. कधी कोणता रुग्ण येईल, हे सांगता येत नाही. तसेच रुग्णाचा जीव वाचवतांना आपल्यालाही हा आजार होऊ नये, यासाठी डॉक्टरांनाही सावध रहावे लागते
- डॉ. सी.जी.चौधरी अध्यक्ष आयएमए
जळगाव : गेल्या काही काळात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरही स्वत: बाधित झाले आहेत. जिल्ह्यात साधारणत: १० टक्के डॉक्टर हे बाधित झाले आहे. तर राज्यात काही डॉक्टरांचा कोरोनानेच बळी घेतल्याचेही समोर आले आहे, अशा परिस्थितीत रुग्णसेवा आणखीच आव्हानात्मक झाली आहे. आता डॉक्टरांना रुग्णांसोबत स्वत:चीच जास्त काळजी घ्यावी लागत असल्याचे आयएमएचे नवे अध्यक्ष आणि प्रख्यात सर्जन डॉ. सी.जी. चौधरी यांनी सांगितले
डॉ. सी.जी. चौधरी यांनी १९७८ मध्ये एम.एस केले. त्यानंतर ते शेवगाव ता.अहमदनगर येथे काही काळ मिशनच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि सर्जन म्हणून काम करत होते. त्यानंतर ते १९८२ च्या सुमारास जळगावला परतले. तेव्हापासून ते आजपर्यंत ते रुग्णसेवा देत आहेत. नुकतीच त्यांची जळगाव आयएमएच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न - आयएमएच्या अध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास कसा होता.
डॉ.चौधरी : मी गेल्या कार्यकाळात आयएमएचा उपाध्यक्ष होतो. आयएमएमध्ये वरिष्ठतेनुसार हे अध्यक्ष हे पद दिले जाते. त्यानुसार १ एप्रिलपासून पुढील वर्षभर मी या पदावर आहे. यात आयएमएचे ६०० सदस्य आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या समित्या आहेत. त्यात क्रीडा, सामाजिक कार्य यांचाही समावेश असतो.
प्रश्न - सध्या कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टरांसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत.
डॉ. चौधरी- रुग्णांची सेवा करणे हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र त्यासोबतच डॉक्टरांना आता स्वत:ची देखील काळजी घ्यावी लागत आहे. जिल्ह्यातील काही डॉक्टरांना या संसर्गाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता डॉक्टरांनी स्वत:ची काळजी घेतलीच पाहिजे. रुग्णाचा जीव वाचवताना आपलीही काळजी घ्यावी. यासोबतच डॉक्टरांनी समाजहित देखील पाहिले पाहिजे.
प्रश्न - आयएमएचे डॉक्टर स्वेच्छेने मोफत आणि शासकीय कोविड रुग्णालयात सेवा द्यायला तयार आहेत का?
डॉ. चौधरी - गेल्या वेळी जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हा काही आयएमएच्या काही सदस्यांनी स्वत: जिल्हा रुग्णालयात जाऊन सेवा दिली होती. तसेच जो पर्यंत सरकारी यंत्रणा सुरळीत होत नाही. तोपर्यंत बहुतेक डॉक्टर्स तेथे सेवा देत होते. समाजासाठी आपण काही देणे लागतो, ही भावना बहुसंख्य डॉक्टरांमध्ये नेहमीच असते.