‘नाना, मी सदराचं लेखन थांबवतोय.’‘वा, वा, वा. उत्तम निर्णय! तुझे वाचक सुटकेचा नि:श्वास टाकतील. किती बरं वाटलं ऐकून मला. किडनी स्टोन निघून गेल्यानंतर जसं बरं वाटतं ना, तसं बरं वाटलं. तो स्टोन पास होत असताना वेदना होतात, पण पूर्ण निघून गेल्यावर कसं छान वाटतं. मग काय आम्हा वाचकांना ‘गुड बाय’ म्हणणार तर...’‘नाना, गुड फ्रेंडस् नेव्हर से गुड बाय, दे सिंपली से, सी यू अगेन’‘बापरे, म्हणजे तू पुन्हा कधीतरी आम्हाला छळण्याच्या तयारीत आहेस की काय?’‘त्याचं काय आहे नाना, जेव्हा लेखकाला कसं थांबवावं, हे संपादकांना कळत नाही, आणि आपण कुठे थांबावं हे लेखकाला कळत नाही, तिथे आणि तेव्हाच लेखनाला छळछावणीचं स्वरूप येतं आणि ज्यांच्यात ‘आता जातो’ असं स्वच्छेने म्हणण्याचं सौजन्य असतं, त्याचंच स्वागत ‘केव्हाही या, तुमचं स्वागतच आहे. ‘ह्या शब्दात होत असतं. नाना, मानवी जीवित असो की जीवित कार्य, ‘थांबल्या’च्या दु:खापेक्षा ‘चालू होतं’ ह्याचा आनंद मोठा असतो.‘तू काहीही म्हण, माणूस दृष्टिआड गेला की इतरांसाठी तो संपलेलाच असतो. तू आता आमच्यासाठी मेलेलाच असणार आहेस. म्हणून तर म्हणतोय, ‘गुड बाय’. मेल्यानंतर काय? ह्याचा तू विचार करून ठेव.’मी मिस्किल हसत म्हटलं, ‘नाना, मी तोही विचार करून ठेवला आहे. ऐक-भोकांडाला कमीच पसरा मी मेल्यावर,थोतांडाला थोडे विसरा मी मेल्यावर .श्रद्धांजलीचे निमित्त पुन्हा मिळाले तरी,माझ्यावरती कमीच घसरा मी मेल्यावर.‘हॅलो, लेखकू, भूतांवरचा लेख द्याल का’?‘अमावस्येला’ ‘घंटी’ मारा, मी मेल्यावर.’किती ग्रंथ मी तुमच्या कडूनी आणले होते,भूषवतील रद्दीभांडारा, मी मेल्यावर.ज्यांच्या इच्छा अपुऱ्या त्यांना मुक्ती नसते.इथेच भेटू, प्रतीक्षा करा, मी मेल्यावर.माझ्या ह्या खुर्चीची आशा ठेवू नका रे.चितेत नेईन, तिलाही विसरा, मी मेल्यावर.‘सोडणार नाही बच्चम्जी’ खुनी म्हणाला,दिले सोडून मला गटारां, मी मेल्यावर.भाडोत्री छाती पिटणारे लागतील की,फुकट न ढळतील अश्रूधारा मी मेल्यावर.गरजच नाही वाड्यावर ‘रामू’ काकाचीकंदील घेऊन मारीन चकरा मी मेल्यावरपळून गेली तीही त्या चोराच्या सोबत.हे जमले नसते का चोरा, मी मेल्यावर.माझी आजी कोणाला प्रेमाने आता,म्हणेल ‘मेल्या’ तिला विचारा, मी मेल्यावर.नुसती सर्दी होता कसले हुरळून जाता?आनंदोत्सव करा साजरा मी मेल्यावर.शिस्तीस माझ्या मानत आले कुटुंब सगळे,म्हणेल, ‘गो टू हेल, हिटलरा’ मी मेल्यावर.‘भविष्यवेधी’ कालोच्छेदी’ कविता लिहिली,रद्दीतही ती ठरेल कचरा मी मेल्यावर.- प्रा.अनिल सोनार, धुळे
पुन्हा भेटू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 2:13 AM