ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - गाळेकरारप्रश्नी न्यालयालयाने दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर गाळेधारक संघटनांकडून नेत्यांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहेत. गाळेधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी मुंबईत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली व मदत करण्याची मागणी केली. गाळेधारक हे तीन दिवसांपासून मुंबईत मुक्कामी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गुरुवारी भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. गाळेकरारप्रश्नी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेण्याबाबत निर्णय दिला आहे. याबाबत व्यापारी व मनपा यात सुवर्णमध्य साधावा अशी अपेक्षा व्यक्त करत सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केट गाळेधारक संघटनेच्या प्रतिनिधींनी शनिवारी मुंबईत सुरेशदादा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. फुले मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष हिरानंद मंधवाणी, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, राजेश वरयाणी, राजकुमार आडवाणी, प्रकाश समदडिया, प्रदीप जैन, राम भगवाणी, राजू साहित्या यांच्यासह अन्य गाळेधारकांचा या शिष्टमंडळात सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्लागाळेधारकांनी घेतलेल्या भेटीप्रश्नी सुरेशदादा जैन यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा केली. उच्च न्यायालयाचा निकाल असल्याने त्यानुसार कारवाई होईल मात्र गाळेधारक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात असे गिरीश महाजन यांनीही यावेळी स्पष्ट केले. तर सुरेशदादांनी देखील गाळेधारक संघटनेच्या पदाधिका:यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. लढ्ढा यांच्याशीही साधला संवादगाळेधारकांनी केलेल्या आग्रहावरून सुरेशदादांनी मुंबईहून महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधला. लढ्ढा यांनी यावेळी न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. गाळेधारकांनी आपली मुंबईत भेट घेतली. त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यांच्याबाबत सहानुभूती असली तरी न्यायालयाचे निर्देश असल्याने गाळेधारकांना सर्वोच्च न्यालयालय हाच पर्याय आहे.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री