आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०: गुन्हेगार पडताळणी बैठक सुरु असताना साहेबराव राधेश्याम ढंढारे (रा.गुरुनानक नगर, जळगाव) या मनोरुग्णाने पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या दिशेने दगडांचा मारा केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी शनी पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. दरम्यान, दगडफेक करणा-याचा शोध घ्यायला गेलेल्या ज्ञानेश्वर कोळी या पोलीस कर्मचा-याच्या हाताला ढंढोरे याने चावा घेतला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशानुसार प्रत्येक उपविभागात दर शनिवारी एका पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार शनिवारी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा-यांनाही बोलावले जाते. या बैठकीत शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२ गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचारी उपअधीक्षक सचिन सांगळे यांची प्रतिक्षा करीत असताना अचानकपणे बैठकीच्या ठिकाणी दगडांचा मारा सुरु झाला, त्यामुळे सर्वच जण अवाक् झाले.