बोअरवेलसाठी नियमावली लागू करण्याची मागणी
जळगाव : शहरात सध्या बांधकामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बोअरवेलची कामेही सुरू आहेत. मात्र, बोअरवेल खणताना नागरिक प्रशासनाची परवानगी न घेता, काम करत आहेत तसेच नियमावलीचेही पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने बोअरवेलबाबत नव्याने नियमावली लागू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दशक्रिया विधीसाठी फक्त १० लोकांना प्रवेश
जळगाव : शहरातील पांझरापोळ संस्थान येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशक्रिया विधीसाठी फक्त १० लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव : शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी प्रताप नगर येथील एका खासगी रुग्णालयात सकाळी १० ते ५ यावेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांतर्फे हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
उद्यानातील समस्यांबाबत आयुक्तांना निवेदन
जळगाव : मेहरुण येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पथदिवे नसल्यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच उद्यानात संरक्षक भिंत उभारणे, बसण्यासाठी बाके बसवणे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवणे आदी समस्यांबाबत परिसरातील रहिवासी अनू कोळी यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.