लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव डिस्ट्रीक मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे आणि कार्यकारी मंडळाचे फेरफार अर्ज फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आगामी १९ रोजीची सभा घेण्याचे अधिकार नसून ही सभा घटनाबाह्य असेल, अशी माहिती दीपक जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. बनावट दस्तऐवजांच्या आधारे एक हाती सत्ता राखली जात असल्याचा आरोपही जोशी यांनी केला आहे.
जोशी यांनी सांगितले की, १९९३ ते २००५ पर्यंतचे ४ फेरफार अर्ज धर्मदाय उपायुक्त यांच्या न्यायालयाने २०१९ आणि डिसेंबर २०२० मध्ये फेटाळले आहे. या आदेशाविरुद्ध सुनील भंगाळे यांनी वरिष्ठ न्यायालयातत अपील दाखल केले असून त्याचे कामकाज न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाच्या कामकाजासाठी संस्थेच्या पैशांचा अपव्यय होत असून सभेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ मोठ्या रकमांची परस्पर देवाण, घेवाण करण्यात आली असून लेखा परिक्षण अहवालातही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. बी. जे. मार्केट येथील मिळकत परस्पर कमी किमतीत विक्री केल्याचेही निदर्शनास आले असून यात न्यायालयाची परवानगी घेतली नसल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
सुनील भंगाळे हे संस्थेची मिळकत, पैसा यांचा स्वत: गैरमार्गाने विल्हेवाट लावून आर्थीक फायदा करून घेत असल्याचा आरोपही जोशी यांनी केला असून या संपूर्ण बाबी स्पष्ट झाल्याशिवाय त्यांना कार्यकारी मंडळात कार्यरत राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांच्या मागील काळाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, असे जोशी यांनी म्हटले आहे. अध्यक्ष सुनील भंगाळे आणि मानद सचिव अनिल झवर यांनी संस्थेच्या नावावर अजेंडा काढून १९ रोजी सभा बोलावली असून ही बेकायदेशी आहे. म्हणून याबाबत लेखी हरकत घेणार असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
निवडणुकीवर आक्षेप
सभेतील विषयांमध्ये १३ क्रमांचा विषय हा निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निवडीचा असल्याने याबाबत जोशी यांनी आक्षेप नोंदविला आहे. मर्जीतील सदस्याची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करून नियमावलीच्या विरूद्ध जावून निवडणूक कार्यक्रम राबविला जातो, असेही जोशी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या बाबींचे सुनील भंगाळे यांनी स्पष्टीकरण द्यावे, तेव्हाच निवडणूक घ्यावी, अशी दीपक जोशी यांनी मागणी केली आहे.
कोट
निवडणूका आल्यानंतर प्रसिद्धीसाठी हे आरोप केले जातात. दीपक जोशी हे स्वत: निवडणुक लढवितात, शिवाय ते स्वत: निवडणूक निर्णय अधिकारीही होते. आरोप करण्यापेक्षा केमिस्ट बांधवांसाठी आपण काय केले हे त्यांनी सांगावे. संस्थेची कुठलीही मालमत्ता विकलेली नसून ती संस्थेच्या ताब्यातच आहे. सर्व निर्णय हे संघटनेच्या ठरावानुसारच घेतले जातात. सभेविषयी त्यांनी सभेत विरोध नोंदवावा.
- सुनील भंगाळे, अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन