जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या आगामी सभेसाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात येत असून यासाठी विभागप्रमुखांच्या बैठकाही होणार आहे. सर्वसाधारण सभेतही याच मुद्दयावर चर्चा झाली होती. दरम्यान, सोमवारपर्यंत सर्व नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्रास कायम
जळगाव : नेरी नाका ते पांडे डेअरी चौकापर्यंत खड्डे वा वाहतूक कोंडीचा त्रास कायम असून या रस्त्याच्या दुरूस्तीकडे महापालिका लक्ष देत नसल्याने वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
यावलला तीन रुग्ण
जळगाव : यावल तालुक्यात रुग्ण घटले असून या ठिकाणी शुक्रवारीही एकाही रुग्णाची नोंद नसल्याने सक्रीय रुग्णांची संख्या ३ वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण घटले आहेत. मात्र, मध्यंतरी संख्या पुन्हा वाढली होती. तालुक्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.
अहवाल प्रलंबित
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना तपासणीचे ५८३ अहवाल प्रलंबित आहेत. जळगाव शहरात व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू झाल्याने हे अहवाल प्रलंबित राहत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णांचे अहवाल लवकर देण्याला प्राधान्य असते, त्यामुळे मोहिमेतील अहवालांना विलंब होत असल्याचे चित्र आहे.
कुत्र्यांची दहशत
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून रस्त्यांवर चालणाऱ्या व्यक्तिंनाही हे कुत्रे चावा घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांची उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.