वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी येथील मराठी शाळेच्या व्हरांड्यात ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील व्यावसायिक तसेच दुकानदार यांची कोरोना विषाणूच्या संदर्भात पाळावयाच्या नियमांबद्दल सूचना देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत आपापले व्यवसाय सुरू ठेवण्याचे पूर्वीच जाहीर केले असून शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश आहेत. परंतु व्यावसायिक व दुकानदारांच्या मागणीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून वरखेडी ग्रामपंचायतीने सोमवार ते शनिवार सायंकाळी चारपर्यंत आपले व्यवसाय तथा दुकान सुरू ठेवण्याचे एकमत झाले. परंतु व्यावसायिक तथा दुकानदारांनी मास्क वापरणे आपल्या दुकानात पारदर्शी प्लॅस्टिकचा वापर करावा. हॉटेल चालकांनी पाचपेक्षा जास्त लोक जमवता पार्सल सुविधेवर भर द्यावा आणि शासन आदेशानुसार काटेकोरपणे पालन करावे, असे ठरले. रविवार संपूर्ण दिवस सर्वांनी बंद पाळणे बंधनकारक राहील. यात फक्त दूध डेअरी, मेडिकल, दवाखानेच सुरू राहतील, असे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीसाठी सरपंच प्रतिनिधी म्हणून माजी सरपंच धनराज विसपुते, ग्रामपंचायत सदस्य संजय कर्नल, ज्ञानेश्वर खोंडे, चंद्रकांत सोनवणे, विजय भोई, संजय पाटील, राकेश पाटील, लिपिक शेनफडू बोरसे, शिपाई सागर चौधरी,व गावातील सर्व व्यावसायिक तथा दुकानदार उपस्थित होते.