चाळीसगाव, जि.जळगाव : शहरातील सिग्नल चौकातील नियोजित जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आरक्षित आहे. मात्र जागेबाबत वाद असल्याने याविषयी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच वादावादी झाली.सकाळी ११ वाजता सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली.या वेळी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटनेते व नगरसेवक उपस्थित होते.सभेत शविआचे गटनेते राजीव देशमुख यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सिग्नल चौकातील जागा ही पालिकेची असून पुतळा होण्याबाबत कुणाचेही दुमत नाही. यावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी हरकत घेतली. जागा जर पालिकेची होती. मग इतक्या वर्षात पुतळा का होऊ शकला नाही, असा प्रतिप्रश्न उपस्थित झाल्याने देशमुख आणि पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली. यावर गदारोळ झाल्याने अर्धा तास गोंधळ झाला.यानंतर शहरात मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरे यांचा उच्छाद असल्याचा मुद्दा रामचंद्र जाधव आणि शेखर देशमुख यांनी मांडून बंदोबस्त करण्याची मागाणी केली.खरजई रोडस्थित अमरधाम येथे आई-वडिलांच्या स्मरणार्थ कैवल्यव्दार बांधून देण्याची तयारी सुरेश हरदास चौधरी यांनी दर्शविली. हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. उर्दू शाळेच्या जागा प्रश्नांवरही कलगीतुरा रंगला.
शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रश्नावर सभा गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:10 AM