जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावांमधील गौण खनिजाच्या गैरव्यवहार प्रकरणात वारंवार पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने सदस्या पल्लवी सावकारे आणि काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत संताप व्यक्त केला. यावेळी लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एल. पाटील यांचा पदभार काढण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सदस्यांना दिली.
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑनलाइन पद्धतीने जलव्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. गौण खनिज रॉयल्टीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही चौकशीचे आदेश दिले होते. यासह पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विभागाचे दोन कर्मचारी अद्यापही माहिती देत नसल्याचा मुद्दा पल्लवी सावकारे व प्रभाकर सोनवणे यांनी मांडला. या प्रकरणात निश्चित कारवाई होईल, तसेच आजपासूनच एस. एल. पाटील यांचा पदभार काढल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिली.