गैरसोय : तर विदर्भ एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कल्याण रेल्वे स्टेशनजवळील खडावली आणि अटगावदरम्यान मंगळवारी मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या ट्रॅफिक व पाॅवर ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मंगळवारी रात्रीची हावडा-मुंबई एक्स्प्रेस जळगावहून पश्चिम रेल्वेमार्गे मुंबईला रवाना होणार आहे, तर विदर्भ एक्स्प्रेस दोन तास उशिराने मुंबईकडे जाणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी आणखी एक गर्डर टाकण्यासाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, असा एकूण चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्रीचा हा ब्लॉक असल्याने मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल व महानगरी एक्स्प्रेस या सर्व सुपरफास्ट गाड्या रात्री बारापर्यंत मुंबई येथून निघून जात असल्याने मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गाड्यांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार धावणार आहेत.
इन्फो :
फक्त हावडा एक्स्प्रेस पश्चिममार्गे वळविली
मध्यरात्री सुरू होणारा हा मेगा ब्लॉक पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. या ब्लॉकच्या वेळेत पहाटे तीन वाजता कल्याण येथे पोहोचणारी भुसावळ विभागातील फक्त (गाडी क्रमांक ०२८१०) हावडा-मुंबई एक्स्प्रेस आहे. ही गाडी जळगाव येथून रात्री साडेनऊ वाजता सुटल्यानंतर पहाटे तीन वाजता कल्याण येथे पोहोचते. मेगा ब्लॉकमुळे ही गाडी कल्याण रेल्वे स्टेशनच्या अलीकडेच रखडणार असल्यामुळे, रेल्वे प्रशासनातर्फे ही गाडी पश्चिम रेल्वेमार्गे सुरतकडून मुंबईला रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीने मनमाड, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
इन्फो :
कल्याणच्या प्रवाशांसाठी भिवंडीला ‘हावडा’ थांबणार
दररोज नाशिक, कल्याणमार्गे मुंबईला जाणारी हावडा एक्स्प्रेस ही गाडी मेगा ब्लॉकमुळे मंगळवारी सुरतमार्गे मुंबईला जाणार आहे. यामुळे जळगावहून कल्याणला उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हावडा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गावरील भिवंडी रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे. या ठिकाणाहून कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.