जळगाव : महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या राज्य सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मुलींच्या सिनियर गटात जळगावच्या मेघना नाईक, पौर्णिमा चव्हाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू आहे. स्पर्धेत शुक्रवारी सांघिक गटाचे सामने पार पडले होते. तर शनिवारी या स्पर्धेतील मुले आणि मुलींच्या गटातील वैयक्तिक सामने पार पडले.
या स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या गटात बुलढाण्याचा संग्राम सिंग, मुंबईचा प्रणव पाटील , उस्मानाबादचा स्वराज भिसे, यशराज हुंडेकर, कृष्णा थिटे, पुण्याचा हृषीकेश विरु, सोलापूर तोंदारे, रायगडचा अश्विन प्रभू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या ज्युनिअर गटात पुण्याची आयुषा इंगवले, आयाती दंडाडे, उस्मानाबादची प्रियांका हंगारकर , बुलढाण्याची भक्ती साळुंखे, विनिता खेडक, देवश्री जगताप, मुंबईची नेहा केळकर, निष्क वाघेला यांनी उपांत्य पूर्व सामन्यात प्रवेश केला. मुलीच्या वैयक्तिक सिनियर गटात पुण्याची आयुषा इंगवले, अदिती धनडाडे व जळगावची मेघना नाईक, पौर्णिमा चव्हाण, यांनी आपापले सामने जिंकून उपांत्य सामन्यात प्रवेश केला. पौर्णिमा हिने मुंबईच्या खेळाडूला पराभूत केले. मेघना हिने कोमल पाटील हिचा पराभव केला. स्पर्धेतील सांघिक आणि वैयक्तिक गटातील सामने रविवारी होणार आहेत.