लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मासिक सभांना सतत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्या प्रकरणी कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्कर पाटील यांना अपात्र करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी होऊन त्यांनी हे आदेश दिले आहेत.
तेजराव पाटील हे २२ जून २०२० पासूनच्या नऊ सभांना गैरहजर होते. याबाबतीत गटविकास अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. अधिनियमातील तरतूदीनुसार तेजराव पाटील यांना सुनावणीची संधी देण्यात आली होती. मात्र, तिनही वेळेस ते गैरहजर राहिले व त्यांच्याकडून ॲड. वसंत भोलाणकर यांनी बाजू मांडली. त्यांना तीन संधी देण्यात आल्या असल्याने अखेर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४० (ब) मधील तरतुदीच्या तसेच प्रकरणातील अभिलेख यांची खात्री करून ते ग्रामपंचायत सदस्य म्हूणन राहण्यास अपात्र असल्याचा आदेश अध्यक्षा रंजना पाटील यांनी २७ रोजी दिला आहे.