चाळीसगाव : पुस्तकं माथी भडकवत नाहीत तर घडवतात. मात्र ग्रंथालयांची चळवळ चालविणे लष्कराच्या भाक-या भाजण्यासारखेच आहे,अशी खंत नोंदवली होती खुद्द कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी. ३४ वर्षानंतरही चाळीसगाववासीयांच्या मनमंदिरी या संवादाची स्मृती ज्योत अजूनही तेवते आहे. तात्यासाहेबांनी नोंदवली ३४ वर्षापूर्वीची वेदना आजही कायम आहे. ग्रंथालयांसमोरील प्रश्नांची रांग पाहता मराठी भाषादिनी कुसुमाग्रजांची व्यथा म्हणूनच बोलकी ठरते. माय 'मराठी'च्या वाटेतील काटेही दाखवते. गतवर्षी तर कोरोनामुळे ग्रंथालयांची वीणच उसवली गेली.कविश्रेष्ठांच्या या ग्रंथालय चळवळीच्या 'गर्जा जयजयकार' करणा-या स्मृती आजही शतकोत्तर वाटचाल करणा-या नारायण बंकट वाचनालयाने जपल्या आहेत. वाचनालयाच्या अमृत महोत्सवाचा दीप तात्यासाहेबांच्या हस्ते प्रज्वलित झाला होता. ६ जून १९८७ रोजी कविश्रेष्ठांनी चाळीसगावी पायधूळ झाडून येथील सांस्कृतिक क्षेत्राला भरजरी साजच दिला आहे. तात्यासाहेबांनी वाचनालयाच्या अमृत महोत्सवाचा दीप पेटवला तर सांगतेचे पुष्प प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अशोक मोडक यांनी गुंफले होते. कवीश्रेष्ठांनी चाळीसगावकरांशी साधलेल्या संवादाचा तो दिवस मंत्रलेलाच होता. विशेष म्हणजे आजही अनेक ज्येष्ठ वाचनप्रेमी कविश्रेष्ठांच्या आठवणींविषयी भरभरुन बोलतात.स्मरणिकेत जागविल्या आठवणी१ फेब्रुवारी १९९२ रोजी वाचनालयाने प्रकाशित केलेल्या अमृत महोत्सवी स्मरणिकेत तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या वाचनालय भेटीच्या मंत्रमुग्ध आठवणी जागविल्या आहेत. वाचनालयाचे तत्कालिन अध्यक्ष स्व. डॉ. श्या.वा. देव, कै. डॉ. वा. ग. पूर्णपात्रे, डॉ.सुनील घाटे, डॉ.प्रमिला पूर्णपात्रे यांच्यासह वसंतराव चंद्रात्रे यांच्या प्रयत्नाने तात्यासाहेबांच्या दुर्मिळ भेटीचा योग जुळून आला होता. म्हणूनच तात्यासाहेबांच्या जन्मदिनी या आठवणी उजळून निघणे ही एक आनंदवारीच आहे, अशा प्रतिक्रिया काही पुस्तकप्रेमी आवर्जुन व्यक्त करतात.कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकरांच्या हस्ते वाचनालयाच्या अमृत महोत्सवाचा मंगल कलश पुजिला जावा. हा खचितच चाळीसगावकरांचा अभिमान बिंदूच आहे. अनेकविध संकटांवर मात करुन ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आम्ही तिचा प्रचार आणि प्रसारही करतोयं. सध्याच्या अॉनलाईन युगात पुस्तकमैत्री वाढविण्यासाठी मुक्तव्दार ग्रंथालय, बालकांसाठी वाचन शिबिरे, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय आदी उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. त्याला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक वाचकांसाठी आम्ही वाचनासाठी लवकर विशेष सोयही करीत आहोत. यावर्षी कोरोनामुळे मराठी भाषा गौरव पंधरवड्यात कार्यक्रम घेता आले नाही.- सुबोध शिवचंद्र मुंदडा, संचालक, ना.ब.वाचनालय, चाळीसगाव
चाळीसगावी तेवताय कुसुमाग्रजांच्या भेटीच्या स्मृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 1:40 AM